
मोरवाडी येथील श्रीमान टी. जे. चौहान माध्यमिक विद्यालयातील संस्कृत विषयात इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या एकूण ८२ गुणवंत विद्यार्थ्यांना शंकराचार्य न्यासतर्फे तब्बल ₹७६,२५० इतक्या भरघोस रकमेचे धनादेश तसेच प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी व पर्यवेक्षक श्री. दिनेश अहिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश व प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. संस्कृत विषय शिक्षक श्री नितीन कंक, सौ अलका चंद्रात्रे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी यांनी शंकराचार्य न्यासाने संस्कृत विषयाच्या संवर्धनासाठी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी या सन्मानातून प्रेरणा घेऊन संस्कृत विषयाचा अधिक अभ्यास करावा आणि भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाबद्दलची आवड वृद्धिंगत होऊन गुणवत्तापूर्ण अध्ययनासाठी नवचैतन्य निर्माण झाले.

