
सेलू 🙁 प्रतिनिधी )बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथे विद्यार्थ्यांमधील स्वयंपाककलेची आवड, सर्जनशीलता, स्वावलंबन आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने कुकिंग वर्कशॉप उत्साहात आयोजित करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “अग्नीशिवाय पाककला / आग न वापरता स्वयंपाक ” तर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ” अग्नीच्या साह्याने पाककला/ आग वापरून स्वयंपाक” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पौष्टिक, स्वादिष्ट आणि आकर्षक खाद्यपदार्थ तयार करून आपल्या पाककौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या कार्यशाळेस अभिजीत सॅम्युएल सर आणि अंजली सॅम्युएल मॅडम यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, सुरक्षितता, पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच अन्न तयार करण्याच्या योग्य पद्धती यांविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ आत्मविश्वासाने तयार केले.
यावेळी मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वयंपाककला ही केवळ एक कला नसून जीवनातील अत्यावश्यक कौशल्य आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संघभावना आणि स्वावलंबनाची भावना विकसित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कौशल्याधारित उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यशाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे सर्वांनी कौतुक केले. हा कुकिंग वर्कशॉप विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.

