
नाशिक,(प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या मागणीपत्रानुसार नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांबाबत जे. एस. रुंगटा विद्यालय, नाशिक येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाभरातील ४२३ महिला व पुरुष शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत काही अधिकाऱ्यांवर नावानिशी आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. एक महिन्याच्या आत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली न काढल्यास शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

बैठकीत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, बी.एड., ए.टी.डी., डी.एड. टू एम., संवर्गबदल व शिक्षणसेवक यांच्या प्रलंबित मान्यता आठ दिवसांत विशेष शिबिर घेऊन देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुकंपा तत्त्वावरील मान्यता व शालार्थ आयडीची कार्यवाही आठ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, तसेच एकस्तर बिले ३० ऑगस्टपर्यंत मंजूर केली जातील, असे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.

थकीत वैद्यकीय बिले दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येतील. न्यायालयाच्या निर्णयानुसार कल्पनिक वेतनवाढ लागू करण्यात येईल व प्रलंबित एनओसी तातडीने देण्यात येतील. रोस्टरमधील अडचणी, रजा रोखीकरण, प्रशासक नियुक्त्या, अटॅच डीटीएच प्रकरणे, वादग्रस्त संस्थांची चौकशी आणि तात्पुरत्या स्वाक्षरी अधिकारांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
एनपीएस सेवानिवृत्तीचे सर्व प्रलंबित प्रस्ताव एका महिन्याच्या आत स्वीकारण्यात येतील, असे आश्वासनही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले.
बैठकीस शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र बोडके, वेतन पथक अधीक्षिका प्रीती पवार, वरिष्ठ लेखापाल जेऊरकर, उपशिक्षणाधिकारी आकुसकर तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये विनोद हिरे, एम के वाघ,मोहन चकोर, विजय बडे, अरुण पवार, निलेश गांगुर्डे, राजेंद्र सोमवंशी, साहेबराव कुठे, एस. बी. देशमुख, हेमंत पाटील, प्रदीप सांगळे, गोरख कुनगर, त्र्यंबक मार्कड, दिनेश अहिरे, कलीम अन्सारी, सुरेश घरटे, राम धोंगडे, दत्ता वाघे पाटील, शंकर सांगळे, रोहित गांगुर्डे, संग्राम करंजकर, छोटू शिरसाट आदींसह जिल्ह्यातील सुमारे ४०० समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मधुकर वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

