
सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते..
सिन्नर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागामध्ये वाढत्या
भोंदूगिरीला आळा बसावा आणि अनेक अनिष्ट, अघोरी, अमानुष अंधश्रद्धांच्या बद्दल समाजात जनजागृती व्हावी तसेच शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी सिन्नर पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच वाडीवस्तीवर जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण आणि त्यामागील सत्यशोधन अशा स्वरूपाचे कार्यक्रम संयुक्त पद्धतीने राबवण्याचा निर्णय आज सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आला.
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि महाराष्ट्र अंनिसचे नाशिक व सिन्नर येथील कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रबोधन मोहिम राबवण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
तशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंनिसच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना देण्यात आले. त्यावेळी श्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या सिन्नर शाखेचे कार्यकर्ते,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके, सिन्नर शाखा अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता वायचळे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे,अंनिसचे
राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे प्रल्हाद मिस्त्री,राजेंद्र फेगडे राज्य प्रधान सचिव डॉ. टि. आर.गोराणे आदी उपस्थित होते..

