नाशिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा आवाका फार मोठा आहे. विशेषत: साहित्याची फार मोठी परंपरा नाशिकला लाभली आहे. त्याबद्दल अनेकांनी भरभरून लिहिलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 'ने मजसी ने परत मातृभूमीला; सागरा प्राण तळमळला...' किंवा 'जयस्तुते'सारख्या गीतांतून भारतभूचं गौरवगान गाणारे स्वा.वि.दा.सावरकर, त्याचबरोबर सावरकरांमुळेच साहित्य क्षेत्राला माहीत झालेले स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद आणि पुढे याच परंपरेत 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार; अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलूनी प्रहार...' असे म्हणणारे 'ज्ञानपीठा'चे मानकरी कवींद्र कुसुमाग्रज म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांना जोडणारा दुवा. याच भूमीत नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात साने गुरुजींची अजरामर साहित्यकृती 'श्यामची आई' निर्माण झाली. 'फुलामुलांचे कवी' म्हणून गौरविलेले नारायण वामन टिळक यांचं साहित्यही याच भूमीत फुललं आणि बहरलं. त्यांच्या पत्नी आणि मराठी साहित्यातील उत्तम साहित्यकृती 'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र याच नगरीत निर्माण झालं. या टिळक दाम्पत्याचे नातू अशोक देवदत्त टिळक हे स्वाभिमानी साहित्यिकसुद्धा नाशिकच्या साहित्य परंपरेतले आघाडीचे साहित्यिक होत. निसर्गकवी म्हणून ओळखले जाणारे बालकवी-त्र्यंबक बापूजी ठोंबरे, खान्देशकन्या बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांना तर नाशिकचा प्रचंड लळा होता. या भूमीने अनेक स्वातंत्र्यशाहीर घडवले. 'रायगडाला जेव्हा जाग येते...' यासारखं ऐतिहासिक नाटक लिहून मराठी साहित्यात ऐतिहासिक नाटकांची अनमोल परंपरा निर्माण करणारे प्रा.वसंत कानेटकर हे गोखले आमच्या ग्रेट मित्राचे नाव घेतील का नाहीशिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 'घाल-घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात; माहेरी जा सुवासाची कर बरसात...' म्हणत माहेरवाशिणीची मनोभावना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक कृ.ब.निकुंभ हेसुद्धा आपल्या नाशिकचेच. नाशिकच्या विनोदी साहित्याची परंपरा डॉ.अ.वा.वर्टी यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. 'सांगा आम्हाला बिर्ला-बाटा न टाटा कुठं हाय हो; आन सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठं हाय हो...' असा बिर्ला-बाटाकडे आपला वाटा मागत 'माणसा इथे मी तुझे गीत गावे...' असं माणसाचं गीत गाणारे महाकवी वामनदादा कर्डक, 'वेदाआधी तू होतास...' असं म्हणत सामाजिक क्रांतीचं साहित्य निर्माण करणारे बाबुराव बागुल आपल्या नाशिकचेच. महाराष्ट्रातील अग्रगण्य नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर, प्रभाकर वैद्य, प्रा.डॉ.चंद्रकांत वर्तक, स.ना.सूर्यवंशी, प्राचार्य प्रभाकर बागले, ॲड.शशिकांत पवार, प्राचार्य पु.भा.गवांदे, प्राचार्य रमेश महाले, प्राचीन साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ.म.बा.कुलकर्णी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बा.य.परिट गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, वा.श्री.पुरोहित, नीळकंठ नांदुरकर, 'साधना' साप्ताहिकाचे दीर्घकाळ संपादकपद भूषवलेले येवल्याचे यदुनाथ थत्ते, भावना भार्गवे, डॉ.शांताबाई दाणी, डॉ.रामदास बरकले, इसाक मुजावर, ॲड.ल.जि.उगावकर, सुनीत पोतनीस, ज्येष्ठ पत्रकार मो.ग.तपस्वी, वसंत पोतदार, भावगीत लेखनात हातखंडा असणारे योगेश्वर अभ्यंकर, पंढरीनाथ सोनवणी, सिन्नरचे मधुकर जाधव, शाहीर काॅ.भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग गायकवाड, आत्मकथनकार रानडे, गीतकार हरेंद्र जाधव हेही याच भूमीतले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार (भगवतीपूर) येथून नाशिकला स्थायिक होत हजारो दिवाळी अंकांत ज्यांच्या कथांना मानाचं स्थान मिळायचं आणि ज्यांनी 'खाणावळ ते लिहिणावळ' असा उत्तुंग प्रवास केला; ते नाशिकच्या साहित्य विश्वातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने, प्राचार्य सर डॉ.मो.स.गोसावी, नाशिकचा चालता-बोलता शब्दकोश असलेले मधुकरअण्णा झेंडे, माजी खासदार ॲड.उत्तमराव ढिकले, मालेगावचे स.गो.चिंधडे, वसंतराव चिंधडे, प्रा.विलास सोनार, कवी गिरीश यांनीही नाशिकच्या साहित्य विश्वाचा झेंडा सर्वदूर फडकवला.
ज्येष्ठ साहित्यिक आणि 'अमृत'चे माजी संपादक मनोहर शहाणे, ज्येष्ठ समीक्षक बा.वा.दातार, जोयासाहेब (उर्दू शायर) यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी नाशिकच्या साहित्य क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. नाशिक आणि शाहिरी परंपरा यांचं अनोखं नातं आहे. गंगापूरचे शाहीर प्रभाकर दातार, वावीचे शाहीर वरदी परशुराम, कसबे सुकेणे येथील शाहीर भीमराव कर्डक, शाहीर प्रसाद अंतरवेलीकर, शाहीर गजाभाऊ बेणी, शाहीर मुळे, कारसूळचे शाहीर केरू घेगडे, ओझरचे शाहीर आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानचे संस्थापक हिरामण जाधव, शाहीर प्रेमानंद दोंदे, शाहीर दत्ता शिंदे, शाहीर दत्ता वाघ, शाहीर बी.डी.जाधव अशा अनेक शाहिरांनी आपल्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सत्यशोधक आणि आंबेडकरी जलसे, संगीत मिळे यांच्या माध्यमातून अखिल मराठी मुलखात आपला डंका गाजवला. कवी किशोरकुमार काकडे, त्र्यं.शं.देशमुख, ग.म.अंधृटकर, पु.शि.शौचे, गोपाळ देशपांडे, प्रा.ल.बा.पवार, श्री.म.मोराणकर, म.वि.गोविलकर, निफाडचे ज्येष्ठ गीतकार राम उगावकर, ज्येष्ठ साहित्यिका जयश्री खिरे, मनमाडच्या साहित्याचं जंक्शन असणारे अनुष्टुभ चळवळीचे सर्वेसर्वा जेष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ.म.सु.पाटील, मालेगावचे यशवंत गुंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक आणि नाट्यदिग्दर्शक वि.मा.दीक्षित-पटवर्धन, प्राचार्य ग.वि.अकोलकर, नाटककार भालचंद्र खांडेकर, कवी शिवाजी साळुंके, प्रख्यात निरूपणककार डॉ.यशवंत पाठक, ॲड.डॉ.डी.एस. कुलकर्णी, बा.ना.तळवाडकर, ब्राह्मणगावचे मु.ग.अहिरे, कवी जे.पी.लळिंगकर, एचएएलमधून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ साहित्यिक एम.जी.वाघ, वणीचे दादा वाघ, गोपाळ रेडगावकर, सटाण्याच्या साहित्यायन चळवळीचे अर्ध्वयु डॉ.मोहन माजगावकर, पी.एस.परचुरे, नागिनी जठार, नलिनी शुक्ल, का.के.कुलकर्णी, रशीद शेख, कुमुदिनी फेगडे, प्रा.थत्ते, खाडीलकर (संस्कृत कवी), उशीर (मनपा), ललित समनोत्रा, टी.एस.बोराटे, संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासिका डॉ.निरूपमा कुलकर्णी, प्र.रं.कुलकर्णी, कवी नंदेश गवारे, काभुराज वाघ, वसंत मोरे, सिन्नरचे पद्माकर दराडे, चांदोरीचे बी.के.बोरसे, सायखेड्याच्या साहित्य चळवळीचे रा.म.घुगे, प्राचार्य के.के.अहिरे, शिंदे येथील कवयित्री जया उकाडे, सिद्धहस्त चारोळीकार पद्माकर भावसार, नाशिकच्या साहित्य चळवळीतील मेहुण जयश्री आणि राम विनायक पाठक, नाशिक कवी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.सुरेश मेणे (कळवण), येवल्याचे ज्येष्ठ समीक्षक प्रा.गो.तु.पाटील, विद्रोही साहित्यिक सतीश आहेर, आपल्या सकस कवितांनी अनेक मैफिली गाजवणारे चांदवडचे डॉ.विठ्ठल शिंदे, गीतकार प्रा.सतीश पिंपळगावकर, कुसुमाग्रजांनंतर नाशिकची ओळख सर्वदूर पोहोचविणारे किशोर पाठक, कवयित्री आणि युवा पत्रकार प्रियंका डहाळे, नाशिकरोड प्रेस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले श्रीधर पांडे, युवाकवी ऋत्विज सतीश काळसेकर, युवा पत्रकार स्वामी गायकर, सदाशिव खांडवे, देवळाली कॅम्पचे जेष्ठ पत्रकार पांडुरंग आडके, युवा पत्रकार प्रशांत धिवंदे, भगूरचे कवी आणि चित्रकार अशोक कातकाडे, योगेश दिंडोरकर, मनमाडचे कवी शिवाजी नामगवळी, प्रताप परदेशी, डॉ.दा.गो.बोरसे, भाषातज्ज्ञ डॉ.र.रा.गोसावी, 'माझी फिल्ममबाजी'कार शिरिष कणेकर, सुनीताबाई देशपांडे, इगतपुरी तालुक्यातील कवी मुकुंद शिंत्रे, देवराम पाटील, पुंजा लहामगे, शिवनाथ मराडे, सामाजिक कार्यकर्ते आणि शारदा बहुउद्देशीय मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा शारदा गायकवाड, प्रा.शरद देशमुख, डॉ.रसिका जाधव अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
आपल्या खुसखुशीत आणि विचारप्रवर्तक लेखनाने वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारे ज्येष्ठ साहित्यिक एन.एम.आव्हाड आणि 'गेले लिहायचे राहून...' असे म्हणत मर्मग्राही लेखन करणारे वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या भाषणांसह लेखनावरही नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं आहे.
नाशिकच्या समीक्षेचा युवा आविष्कार असणारे आणि कोरोना काळात निवर्तलेले प्रा.डॉ.राहुल पाटील, कुरणोलीचे कवी दौलतराव झोमण, ल.रा.पांगारकर, नितीन वाघ यांचेही साहित्यिक योगदान गौरवास्पद आहे.
साहित्यविश्वाचा अकाली निरोप घेणारे भावकवी आनंद जोर्वेकर, 'जगण्याला मनासारखी चाल लावता आली नाही...' असं म्हणणारे विद्रोही कवी अरुण काळे, कामगार कवी कैलास पगारे, कवितेसह साहित्याचे विविध प्रकार हाताळणारे तपस्वी साहित्यिक कमलाकरआबा देसले, दिलखुलास दाद देत आगळंवेगळं लेखन करणारे भीमराव कोते, देवळा तालुक्यातील खुंटेवाडीच्या आस्वाद साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि मित्रांचे मित्र विलास पगार, समीक्षेचा खणखणीत आवाज असणारे मित्रवर्य प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, पत्रकार आणि गझलकार नाना महाजन, नांदगावचे कवी दयाराम गिलाणकर, कवी आणि गायक महेश आफळे, गझलसम्राट सुरेश भट यांची दिलखुलास दाद मिळवणारे गौरवकुमार आठवले अशी या नाशिकच्या साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांची कितीतरी नावे सांगता येतील.
दिग्गज साहित्यिकांची अशी एक ना अनेक नावे माझ्यासमोर आहेत. यात काही साहित्यिकांची नावे आली नसतील; पण त्यांनी नाशिकच्या साहित्य चळवळीच्या वाटचालीसाठी आणि समृद्धीमध्ये दिलेलं योगदान नाकारता येणार नाही. केवळ साहित्यिक नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील सर्वांगीण बदलाचे 'दीपस्तंभ' असणाऱ्या या साहित्यिकांची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन आजची पिढी वाटचाल करत आहे; हे मात्र नक्की!
-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर,
९४२३०९०५२६