
जळगाव (वार्ताहर) पर्यावरणीय संकल्पना, उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने साकारून सादरीकरण केल्याने महोत्सव केवळ पाहण्याचा नव्हे, तर शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि कृतीची प्रेरणा देणारा ठरला, असे प्रतिपादन खा. स्मिता वाघ यांनी केले.
त्या जळगाव महानगरपालिका, नूतन मराठा महाविद्यालय, ग्रीनसिटी फाउंडेशन जळगाव आणि हिरवांकुर फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय हिरवांकुर ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. यावेळी आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर दीपमाला काळे, प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, न्यायाधीश राजेश जोशी, माजी महापौर सीमा काळे, विष्णू भंगाळे, करीम सालार, अनिल अडकमोल, प्रकाश बालाणी, अमृता सोनवणे, विजयकुमार वाणी, निलयबाबू शाह जैन, हिरवांकुरच्या विश्वस्त नलिनी शाह, रफिक व्होरा, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, प्रा. अमोल अहिरे, परीक्षक सुनिल दाभाडे, लेफ्टनंट शामकुमार पाटील, कॅप्टन राजेंद्र राजपूत राखी शाह, सोनाली राजपूत, वेलिना शाह, नाना पाटील, आशिषसिंह हाडा, मयुर चौधरी यांच्यासह जळगाव बार कौन्सिलचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, पालक, एनसीसीचे कॅडेट, स्वयंसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

‘विद्यार्थी दशेतून हरीतसंस्कार’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या महोत्सवात शहर, परिसरातील ८२ शाळा, महाविद्यालयाच्या तब्बल २६ हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट देत पर्यावरण, वृक्षवैविध्यता, जलसंवर्धन, जैवविविधता, कचरा व्यवस्थापन व पुनर्वापर तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचे विविध पैलू प्रत्यक्ष अनुभवले. महोत्सवास जळगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाचे आकर्षण –
● ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ मधून कचऱ्याचे हरित संपदेत रूपांतर – घरोघरी जमा होणार्या हरित कचर्याच्या योग्य व्यवस्थापनाने सेंद्रिय, पोषक खत तयार करणे आणि त्यातून विषमुक्त भाजीपाल्याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक देण्यात आले.
● मातीविरहित बाग – कमी जागेत मातीशिवाय उपलब्ध संसाधनांचा पुनर्वापर करून फुलझाडे, फळझाडे व भाजीपाला घेण्याच्या तंत्रज्ञानाची नाशिकच्या प्रद्युम्न पंडित यांनी साकारलेली संकल्पना सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.
● जलं रक्षति रक्षितम्’‘ कैच द रेन’ संकल्पनेतून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करुन जमिनीत मुरविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जलमंदिराची संकल्पना आपल्या घरात, सोसायटीत, परिसरात साकारण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
●विषमुक्त जीवनाकडे एक पाऊल या संकल्पनेला महोत्सवात कृतीची जोड देण्यात आली. नैसर्गिक शेती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी गौकृपामृत तसेच ताज्या भाजीपाल्याच्या बियांचे निःशुल्क वाटप करण्यात आले.
● १०० दुर्मीळ, आयुर्वेदिक वनऔषधीं या वृक्षांचे आयुर्वेदिक महत्त्व, आयुर्मान आणि निसर्गातील स्थान दर्शवणारे बारकोड तयार करुन प्रत्येक झाडाजवळ एक क्यूआरकोड लावल्याने तो स्कॅन करताच त्याबाबत संपूर्ण माहिती थेट मोबाइलवर उपलब्ध झाली.
● पर्यावरणीय सापशिडी – यात झाड लावले तर शिडीवरून वर जाणे आणि कचरा जाळल्यास सापाच्या तोंडाद्वारे खाली येणे अशा खेळाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा धडा दिला गेला.
● स्पर्धेतून प्रदूषणमुक्तीचा संदेश- निबंध, चित्रकला, रांगोळी, भित्तीपत्रके, पर्यावरणीय घोषवाक्य, पर्यावरण पूरक उपकरणे आदी स्पर्धेत सहभागी तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना, व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सहभागचे प्रमाणपत्र देण्यात आले.

