मोहाडी श्रीकृष्ण व्याख्यानमाला .2026 पुष्प दुसरे


मोहाडी (ता. दिंडोरी) : संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजपरिवर्तनाची क्रांती घडवली. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर परखडपणे प्रहार करून समता, माणुसकी आणि विवेकाचा संदेश दिला, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित ७१ व्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘क्रांतिकारक संत तुकाराम’ या विषयावर गुंफताना श्रीमंत कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे होते.
संत तुकाराम हे केवळ भक्तीपरंपरेतील संत नव्हते, तर त्यांच्या अभंगांमध्ये समाजजागृती आणि परिवर्तनाचा विचार होता. त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समता आणि माणुसकीचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांची आजच्या समाजालाही तितकीच गरज असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता म्हणून कै. भाऊराव देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले होते.
याप्रसंगी मविप्र संचालक संदीप गुळवे, विजय पगार, अमित पाटील, डॉ. मनोज बर्डे, गोविंद पगार, बापूसाहेब पाटील, शहाजी सोमवंशी, प्रवीण जाधव, युवा उद्योजक कौतिक पाटील, विजय जाधव, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलासराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले, तर आभार धनंजय वानले यांनी मानले.

