
राष्ट्रीय अंतराळ दिन
२३ ऑगस्ट हा भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ (National Space Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस २३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोच्या (ISRO) ‘चंद्रयान-३’ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्याच्या ऐतिहासिक स्मृतीप्रित्यर्थ पाळला जातो. २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, हे देशाचे ऐतिहासिक यश होते. यामुळे भारत देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषणा केली. चंद्रावर लँडर उतरलेल्या जागेचे नाव ‘शिवशक्ती पॉइंट’ ठेवण्यात आले आहे. या दिवशी देशभरात इस्रो आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विज्ञान प्रदर्शने, स्पर्धा व विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तरुणांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

जागतिक वडापाव दिन
जगभरात बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरात वडापाव पोहचला आहे मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. १९६६ साली दादर स्टेशन बाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादर मध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगाव मध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातीला बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले. मुंबईतील धीरज गुप्ता या तरुणाने जम्बोकिंग नावाने वडापावला परदेशी लूक दिला. २३ ऑगस्ट २००१ ला धीरज गुप्तांनी वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड चेन सुरु केली. त्यानिमित्तानंच त्यांच्या ९ शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे. वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड. मुंबईत गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हे पटकन रुजलं. खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. त्यामुळेच मुंबईच्या कामगार संस्कृतीची तो ओळख बनला. आज मुंबईत दिवसाला जवळपास १८ ते २० लाख वडापाव खपतात.
१९७० ते १९८० च्या काळात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीया विरुध्द भूमिका घेतल्याने मुंबई मधील दादर, माटुंग्या सारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट करण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीन मध्ये, शाळांच्या कॅन्टीन मध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले. काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढू लागली. त्यामुळेच तोच तोचपणा टाळण्यासाठी मुंबईमध्ये वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळू लागले आणि वडापावमध्ये आणलेले हेच व्हेरिएशन त्या वडापावची ओळख झाले. उदाहणच द्यायचे झाले तर कीर्ती कॉलेज बाहेरच्या वडापाववाल्याने वड्याबरोबर बेसनाचा चुरा देण्यास सुरुवात केली. तर ठाण्यातील कुंजविहारने पहिल्यांदाच मोठ्या पावाचा प्रयोग केला. सामान्यपणे दोन पावांच्या आकाराचा एक मोठा पाव कुंजविहार स्वत: बनवू लागले आणि जम्बो वडापाव ही कुंजविहारची ओळख झाली. ठाण्यातील असेच दुसरे नाव म्हणजे गजानन वडापाव. बेसनाच्या पिवळ्या चटणीमुळे हा वडापाव केवळ ठाण्यातच नाही तर मुंबईकरा मध्येही लोकप्रिय झाला आणि अनेकांनी या पिठल्यासारख्या चटणीची कॉपी करण्यास सुरुवात केली. तर कल्याणमधील वझे कुटुंबाने सुरु केलेला वडापावच्या दुकाना मध्ये वडापाव ग्राहकांना खिडकी मधून दिला जायचा म्हणून तो वडापाव खिडकी वडापाव नावाने लोकप्रिय झाला.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात दाखल झालेल्या परदेशी ब्रॅण्डनीही वडापावचा धसका घेतला होता असं म्हणता येईल. कारण भारतीय बाजारपेठे मध्ये उतरतानाच मॅक-डोनाल्ड्ससारख्या बड्या ब्रॅण्डने भारतीयांसाठी वेगळा मेन्यू तयार केला. यामधील विशेष बाब म्हणजे वडा-पावला टक्कर देण्यासाठी मॅक-डीने ‘मॅक आलू टिक्की’ हा बर्गर स्वरूपातील वडापावचा परदेशी भाऊच जन्माला घातला. बटाट्याची पॅटीस आणि पाव हे बेसिक तसेच ठेवत त्याला थोडा चकाचक लूक देऊन हा परदेशी वडापाव विकला जाऊ लागला. वडापाव झाला, मॅक आलू टिक्कीसारखे त्याचे परदेशी भाऊही भारतामध्ये दाखल झाले आणि मग या दोघांचे फ्युजनही २००० सालापासून उपलब्ध झाले. जम्बोकिंग नावाने वडापावला परदेशी लूक दिला. फरक इतकाच की ‘मॅक आलू टिक्की’ मध्ये नसणारे बेसनाचे आवरण या फ्युजन वडापावमध्ये कायम ठेवण्यात आले होते. या वडापावला इंडियन बर्गर असे नाव देण्यात आल्याने मुंबईबाहेरचे लोक मुंबईच्या खऱ्याखुऱ्या वडापाव ऐवजी या आकर्षक दिसणाऱ्या आणि छान पध्दतीने सादर केल्या जाणाऱ्या वडापावच्या प्रेमात पडले. त्यानंतर गोली सारख्या ब्रॅण्डचा जन्म झाला. आणि स्वच्छतेच्या नावाखाली हे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झालेत असचं म्हणावं लागेल. या ब्रॅण्डेड वडापावमुळे आणखीन परदेशी पदार्थांना वडापावच्या जोडीला साथ देण्यास सुरुवात केली. यातूनच चीज वडापाव, नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनिज वडापाव सारखे भन्नाट कॉम्बिनेश्नस खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवू लागले. त्यातही आधी एकाच आकारात मिळणारा वडापाव ब्रॅण्डींगमुळे मिनी, नॉर्मल आणि जम्बो अशा तीन प्रकारांमध्ये मिळू लागला. आता तर साधा ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड प्रकारातही वडापाव मिळू लागले आहेत. वर्षातून अनेकदा पंचतारांकित हॉटेल्सही या लाडक्या वडापावच्या प्रेमात असल्याचे त्यांनी भरवलेल्या स्ट्रीट फूड फेस्टीवल मधील वडापावच्या व्हरायटीमधून दिसून येते. तर सायकल ट्रेलसारख्या वडापाव खाद्य भटकंतीचे आयोजनही अनेक खाद्यप्रेमी करतात. या खाद्य भ्रमंतीमध्ये मुंबईतील लोकप्रिय वडापाव स्टॉल्स वरील वडापावची चव चाखण्याची संधी तर मिळतेच शिवाय त्या स्टॉलचा इतिहासही सांगितला जातो. अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड मधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएचडी केली आहे आणि लंडन मध्ये मुंबईतील रिझवी कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे. सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
हॅशटॅग दिन
२३ ऑगस्ट हा हॅशटॅग दिन (Hashtag Day) म्हणून साजरा करण्यात येतो. ट्विटरवर २००७ मध्ये क्रिस मेसीना ने हॅशटॅगचा प्रथम वापर सुरू केला. २३ ऑगस्ट २००७ साली १२ वाजून २५ मिनिटांनी प्रसिद्ध सोशल टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट क्रिस मसिना ने “how do you feel about using #(pound) for groups. As in #barcamp [msg]?” असं ट्विट केलं आणि तिथूनच सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंडिंग ची सुरुवात झाली. थोडंसं तांत्रिक बोलायचं झालं तर या हॅश चिन्हाचा ‘#’ उपयोग तंत्रज्ञानाच्या जगातला १९७८ मध्ये ‘सी प्रोग्रामिंग’ या संगणक प्रोग्रामिंग च्या भाषे पासून ज्ञात आहे. या भाषेचे निर्माते डेनिस रिची यांनी ‘#’ सिम्बॉल चा उपयोग सी या भाषेत केला होता जो आजही केला जातोच याशिवाय इतरही अनेक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ‘#’ चे वेगवेगळे उपयोग आहेत. पुढे हे हॅशटंग स्थानिक भाषा मध्येही रुढ झाले. हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम अशा इतर सोशल नेटवर्क वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले आढळतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे संबोधले जाते. जी माहिती दिली जात आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? यावरून लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात. मागील काही वर्षात करोनामुळे जगभरात हॅशटॅगचा वापर झाला. हॅशटॅग मुळे जगभरात ‘मीटू’ सारखी चळवळ उभी राहिली. गेल्या एका वर्षात मनोरंजन क्षेत्रातील हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंडिंग राहिले. यामुळे वर्षभरात या हॅशटॅगच्या वापरात १३३६ टक्क्यांनी वाढ झाली. सोशल मीडिया वर आज हॅशटॅग शिवाय पान हलत नाही. विविध मार्केटकींग एजन्सीज, कंपनी पेजेस, किंवा सामान्य वापरकर्ते हे सगळे हॅशटॅग वापरात असतात. हॅशटॅग तयार करण्याचा एक साधा नियम आहे. कमीत कमी शब्द, शक्यतो एकच शब्द वापरावा. कारण ट्विटर किंवा इन्स्टाग्राम वर शब्द मर्यादा असतात. फेसबुक सारखं तुम्ही त्यावर लांबलचक स्टेटस टाकू शकत नाही. जर एकापेक्षा अधिक शब्द असतील तर या शब्दा मध्ये स्पेस अजिबात सोडायची नाही. सलग शब्द टाईप करायचे # आणि पुढे तुमचे शब्द. यात कुठेही स्पेस पडता कामा नये. समजा तुम्ही सोशलमीडियावर Social Media असं स्टेटस टाकलं तर या दोन शब्दांच्या मध्ये तुम्ही स्पेस देऊन तो टाकता. पण हॅशटॅग तयार करताना असं लिहून चालत नाही ते #SocialMedia किंवा #Social_Media असंच लिहावं लागतं. अंडरस्कोर (_) स्पेशल कॅरॅक्टर हॅशटॅग मध्ये चालते बाकी कोणतेही सिम्बॉल चालत नाहीत.
दहावी बारावी मध्ये असतांना किंवा अगदी पदवी परीक्षेत पेपर मध्ये महत्वाचे शब्द उत्तरात अधोरेखित करायचे असं सांगितलं जातं जेणेकरून त्याकडे परीक्षकाचं पटकन लक्ष जातं. आपल्या सोशल मीडियाच्या भाषेत यालाच आपण हॅशटॅग मुळे एखादी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आली म्हणतो आणि ते अधोरेखित म्हणजेच हॅशटॅग असा तर्क लावता येईल. आत्ताच उदाहरण म्हणजे डिलीट फेसबुक हा सुद्धा एक हॅशटॅग होता. जो खूप ट्रेंड म्हणजे प्रसिद्ध झाला आणि सोशल साईट्स वर गाजला. हॅशटॅग मुळे एक लिंक निर्माण होते. ही लिंक आपल्याला हॅशटॅग मध्ये नमूद केलेल्या विषयाशी संबंधित इतरांनी केलेल्या पोस्ट एकत्रितपणे एका वेगळ्या पानावर किंवा त्याच ठिकाणी एकत्र दाखवतो. गंमत म्हणून एखाद्या हॅशटॅगवर क्लिक करून बघा. अशाने माहितीची वेगवेगळ्या विषया नुसार वर्गवारी होते. आणि असा एकच विशिष्ट हॅशटॅग जगभरातून सोशल मीडियावर पोस्ट होत राहिला तर तो ट्रेंडिंग मध्ये आहे असं म्हंटल जातं. फेसबुक सारख्या अप्लिकेशन मध्ये उजव्या बाजूला ट्रेण्डिंग्स दिसत असतात. क्रिस मसिना ने सोशल मीडिया वर हॅशटॅग यासाठीच आणला होता की सामान्य वापरकर्त्याला कमी कष्टात विशिष्ट माहिती एका हॅशटॅग लिंक वरून उपलब्ध होईल. अनेक मोठमोठ्या कंपनीज हॅशटॅग वापरून आपली नवीन उत्पादने, एखादी ऑफर किंवा नवीन सेवा पोस्ट करत असतात. सोशल मीडिया वरील पोल्स किंवा प्रश्नोत्तरे ह्यात हॅशटॅग वापरले जातात (म्हणजे हा त्याचा मूळ उद्देश आहे) ज्यामुळे ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळेल आणि वाचणाऱ्याला त्याच प्रमाणे कंपनीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याने फायदा होईल. मी सुद्धा पोस्ट मध्ये #INविस्तृत असं हॅशटॅग करतो, तुम्ही त्यावर क्लिक केलं तर सगळ्या पोस्ट एका खाली एक फेसबुक किंवा जिथे हा हॅशटॅग दिसेल तिथे पाहायला मिळतील. हॅशटॅग मुळे फजिती (की पोपट) झाल्याची सुद्धा उदाहरणं पाहायला मिळतात, यालाच बॅशटॅग म्हणतात. मॅक डोनाल्डस ने #McDStories अशा हॅशटॅग मार्फत आपले अनुभव मांडायची विनंती ग्राहकांना केल्यावर अनेक ग्राहकांनी त्यावर विचित्र पोस्ट टाकल्याने या हॅशटॅग ने कंपनीला पश्चाताप झाल्याची शक्यता जास्त. दुसरे उदाहरण जेपी मॉर्गन या प्रसिद्ध कंपनीच्या #AskJPM या हॅशटॅग संबंधी अशाच स्वरूपात देता येईल, तिथेही ग्राहकांनी किंवा ट्विटरकरांनी त्याची फजितीच उडवली होती.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट/स्वप्नील जोशी
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
कवी विं. दा. करंदीकर जन्मदिन

जन्म – २३ ऑगस्ट १९१८ (घालवली,रत्नागिरी)
स्मृती – १४ मार्च २०१०
‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्यातील घालवली या गावी झाला. विंदा हे कोकणातील पोम्बुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूर मध्ये झाल्या नंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज (रत्नागिरी), रामनारायण रुईया महाविद्यालय (मुंबई), एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालया मध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे महत्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. विंदांनी स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकविता संग्रह दिले. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’ पासून सुरू विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता.
स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’ आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणाऱ्या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणाऱ्याने देत जावे’ चा अनुभव रसिकांना दिला. विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहिले तसेच ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही त्यांनी लिहिली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. विं.दा करंदीकर यांची ग्रंथसंपदा – स्वेदगंगा, जातक, विरुपिका, संहिता इत्यादी काव्यसंग्रह; स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ इत्यादी ललित लेखसंग्रह; परी गं परी, राणीचा बाग, इत्यादी बालगीतसंग्रह; किंग लियर, फ़ाऊस्ट इत्यादी अनुवादित ग्रंथ.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

‘जलपरी’ आरती साहा स्मृतिदिन
जन्म – २४ सप्टेंबर १९४० (कोलकाता)
स्मृती – २३ ऑगस्ट १९९४ (कोलकाता)
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय ‘जलपरी’ आरती साहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्या एक लांब अंतर पोहणाऱ्या प्रसिध्द भारतीय महिला आहेत. आरती चार वर्षाची असताना तिने पोहायला सुरुवात केली. तिचे पोहणे सचिन नाग यांनी पाहिले आणि तिची शिफारस केली. इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी त्यांना प्रेरणा दिली. १९५९ मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी पार केली. त्या असे करणाऱ्या आशिया खंडातल्या पहिल्या महिला ठरल्या. १९६० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरतीचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांना दोन मोठ्या बहिणी व एक मोठा भाऊ होता वडिलांचे नाव पंचगोल साहा असे होते. ते भारतीय सैन्यात एक सामान्य कर्मचारी होते. आरती दोन वर्षाची असताना तिची आई गेली. जेव्हा ती चार वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या काकांकडे नागपूर जवळच्या चामपटाला घाटात जायची. तिथे ती पोहायला शिकली. १९४६ मध्ये पाच वर्षे वयाची असताना तिने शैलेंद्र मेमोरियल जलतरण स्पर्धेत ११० यार्ड फ्रीस्टाईल मध्ये सुवर्णपदक जिंकले आणि तेव्हा पासून तिच्या पोहण्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९४६ आणि १९५६ दरम्यान, आरतीने अनेक जलतरण स्पर्धा मध्ये भाग घेतला. १९४५ आणि १९५१ च्या दरम्यान तिने पश्चिम बंगाल मधील २२ राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या. तिचे मुख्य क्षेत्र १०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक असे होते. १९४८ मध्ये तिने मुंबई येथे आयोजित झालेल्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत भाग घेतला. तिने १०० मीटर फ्रीस्टाईल आणि २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्यपदक, आणि २०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये कांस्यपदक जिंकले. १९४९ साली तिने अखिल भारतीय विक्रम केला. १९५१ मधील पश्चिम बंगाल राज्याच्या दौऱ्यावर असताना ती १ मिनिट ३७.७ सेकंदांत ब्रेस्ट स्ट्रोक मारून १०० मीटर पोहली व तिने डॉली नझीरचा अखिल भारतीय विक्रम मोडला. त्याच स्पर्धेत तिने १०० मीटर फ्रीस्टाईल, २०० मीटर फ्रीस्टाईल आणि १०० मीटर बॅक स्ट्रोक्स मध्ये नवीन राज्यस्तरीय रेकॉर्ड सेट केले. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघटनेचे सदस्य संख्यने सर्वात कमी होते. त्यावेळी तिने भारताच्या डॉली नझीर आणखी आणि दोघींसह भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथे तिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक इव्हेंट मध्ये भाग घेतला. हिट्सवर तिने ३ मिनिटे ४०.८ सेकंदांची कमाई केली. ऑलिम्पिक मधून परतल्या नंतर तिने १०० मीटर फ्रीस्टाईलसाठी तिने तिची बहीण भारती साहा हिला गमावले. १९९६ साली त्यांच्या निवासस्थानाजवळ आरती साहा यांचा एक भव्य अर्धपुतळा स्थापन करण्यात आला. तेथे १०० मीटर लांबीचे मोठे दिवे लावण्यात आले.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया
अभिनेत्री सायरा बानू # वाढदिवस
जन्म – २३ ऑगस्ट १९४४ (मसुरी,उत्तराखंड)
अभिनेत्री सायरा बानू यांनी त्यांचे शिक्षण लंडन मध्ये पूर्ण केले आणि वयाच्या १६व्या वर्षी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. शम्मी कपूर यांच्या सोबत ‘जंगली’ या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी धमेंद्र, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी यांच्या सोबतही काम केले. पण, त्यांना एक सुपरस्टार म्हणून स्थान फक्त क्लासिक विनोदी ‘पडोसन’ चित्रपटाने मिळाले. सायरा बानू या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. सायरा बानू या अनेक सिनेमातून एक सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांची फार मोठी कारकीर्द नाही पण त्या अतिशय चांगल्या अभिनेत्री म्हणून आजही ओळखल्या जातात. सायरा बानूंचे सौंदर्य आणि जादू आजही बऱ्याच जणांच्या मनात घर करून आहेत. त्या बॉलिवूड मधील ‘ब्युटी क्वीन अभिनेत्री’ म्हणून ओळखल्या जातात. दिलीप कुमार आणि हिंदी सिनेमा मधील प्रसिध्द अभिनेत्री सायरा बानो यांचे लग्न खूप चर्चेत राहिले. सायरा बानो यांनी वयाच्या २०व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले केले. १९६६ मध्ये झालेल्या या लग्नाला जवळपास ५० हून अधिक वर्षे झाली आहेत. आज ही जोडी बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असून दिवसेंदिवस या दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होत गेले. आजही हे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन आहेत. दिलीपकुमार यांनी लग्नानंतर सायरा बानू यांना हव्या तशा भूमिका करू देण्याचे स्वातंत्र्य देऊन स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा परिघही वाढवला. लग्नापूर्वी अत्यंत पारंपरिक भूमिका करणारी आणि भरगच्च कपडयात वावरणाऱ्या सायरा बानू लग्नानंतर अत्यंत बोल्ड आणि कमी वस्त्रातल्या सेक्सी भूमिका अगदी सहज करू लागल्या. ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपट बोल्ड अभिनयाची नवीन व्याख्या तयार करणारा चित्रपट होता. ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ या चित्रपटातील ‘थोडा सा ठहरो’ हे गाणे बॉलिवुड मधील अनेक हॉट गाण्यांपैकी एक म्हणून आजही स्मरले जाते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
शास्त्रज्ञा अण्णा मणी जन्मदिन
जन्म – २३ ऑगस्ट १९१८ (त्रावणकोर,केरळ)
स्मृती – १६ ऑगस्ट २००१ (केरळ)
देशातील पहिल्या महिला वैज्ञानिका पैकी एक, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा जन्म केरळ मधील त्रावणकोर येथे झाला. त्यांच्या संशोधनामुळे भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावणे शक्य झाले आणि राष्ट्राला अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांना पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे त्या सतत पुस्तक वाचण्यात गुंग असत. तसेच वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयातील सर्व पुस्तक वाचली होती. त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेज (WCC) मध्ये इंटरमिजिएट सायन्स कोर्स केला आणि प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात ऑनर्ससह बॅचलर ऑफ सायन्स पूर्ण केले. पदवी नंतर त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेज मध्ये एक वर्ष शिकवले आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे पदव्युत्तर अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळविली. येथे नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिरे आणि माणिका मध्ये विशेष स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास केला.
१९४२ आणि १९४५ दरम्यान त्यांनी पाच शोधनिबंध प्रकाशित केले व पीएचडी पूर्ण केली. शोध प्रबंध, आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे पदवीधर कार्यक्रम सुरू केला, जिथे त्यांना हवामानशास्त्रीय उपकरणांमध्ये शिकण्यास मिळाले. १९४८ मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी भारतीय हवामान विभागासाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी देशाला स्वत:ची हवामान उपकरणे डिझाइन आणि तयार करण्यास मदत केली. त्या वेळच्या पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांनी इतके प्रावीण्य मिळवले की, १९५३ पर्यंत त्या विभागाची प्रमुख बनल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक हवामान उपकरणांचे डिझाईन्स उत्पादनासाठी प्रमाणित केले गेले. मणी या पर्यायी उर्जा स्त्रोतांचे सुरुवातीचे समर्थक होत्या. १९५० च्या दशकात त्यांनी सौर रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशनचे नेटवर्क स्थापित केले आणि शाश्वत ऊर्जा मापनावर अनेक पेपर प्रकाशित केले. मणी नंतर भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक बनल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९८७ मध्ये त्यांनी विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी INSA के.आर. रामनाथन पदक जिंकले. निवृत्ती नंतर त्यांची बंगळुरू येथील रमण संशोधन संस्थेच्या विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौर आणि पवन ऊर्जा उपकरणे बनवणारी कंपनी देखील स्थापन केली होती.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
अभिनेत्री हंसा वाडकर स्मृतिदिन
जन्म – २४ जानेवारी १९२४
स्मृती – २३ ऑगस्ट १९७१ (मुंबई)
अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांनी मराठी बरोबरच अनेक हिंदी सिनेमांतही कामं केली व मराठी रंगभूमीही गाजवली. ‘सांगत्ये ऐका’ हा त्यांच्या सिनेसृष्टीतील कर्तबगारीचा कळसाध्याय होता. पडद्यावरची त्यांची कामगिरी चतुरस्त्र होतीच पण त्यांचं वास्तवातलं जीवन हे त्या कल्पनाचित्रा पेक्षाही अद्भूत होतं. सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल हे त्यांचे गाजलेले चित्रपट. हंसाबाईंचं घराणं कलावंतिणीचं. त्यांच्या पणजी बायाबाई साळगावकर या कलावंतीण होत्या. कलावंतीणीच्या घरातील स्त्रीनं किंवा पुरुषानं लग्न करणं हे त्या काळच्या परंपरेच्या विरुद्ध होतं. पण हंसाबाईंच्या आजोबांनी लग्न केलं आणि ते प्रकरण गाजलं. हंसाबाईंच्या तीन आत्यांपैकी फक्त सुशीलाबाईंचं लग्न झालं होतं आणि तेही मास्टर विनायकांशी. पण हंसाबाईंच्या सिनेसृष्टीतील प्रवासाशी याचा काहीच संबंध नव्हता. घरखर्चाला पैसे कमी पडू लागले. कलावंतीणीचं घराणं असल्यानं गाणं गळ्यात होतंच. रूपाचा तर प्रश्नच नव्हता. त्यातूनच त्या सिनेमात आल्या. मामा वरेरकरांकडे तेव्हा म्हणजे हंसाबाई अवघ्या दहा वर्षांच्या असताना मास्टर विनायकांची पत्नी सुशीलाबाई काम करत होत्या. त्यातून त्यांचा सिनेमात प्रवेश झाला. भावानं सांगितलं, ‘तू आता सिनेमात चाललीस, तर आपलं साळगावकर नाव लावू नकोस.’ त्यामुळे हंसाबाईंनी बायजी आत्याप्रमाणे वाडकर हे नाव लावायचं ठरवलं आणि त्यांचं मूळ नाव ‘रतन’ हे मामांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी हसतमुख चेहर्या्च्या या अभिनेत्रीचं नाव ‘हंसा’ असं ठेवलं. ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिध्द आहे. या आत्मचरित्रावर श्याम बेनेगल यांना ‘भूमिका’ नावाचा चित्रपट काढला. व त्यात हंसा वाडकर यांची भूमिका स्मिता पाटील यांनी समर्थपणे केली होती.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : विकिपिडीया
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

