
सिन्नर ( प्रतिनिधी), दि. २३ : गेल्या तब्बल तीन दशकांपासून दशनाम गोसावी समाजाच्या सामाजिक संघटन, प्रबोधन आणि समाजहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे श्री. वसंत रामभारती गोसावी, सिन्नर यांची ‘राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाजभूषण पुरस्कार–२०२६’ साठी निवड झाली आहे. भटके विमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजसंघटन, प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रदीर्घ प्रवास
श्री. गोसावी यांनी सन १९९८ पासून दशनाम गोसावी समाजाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी समाजबांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. सिन्नर येथील समाजाच्या समाधीभूमीसाठी मंत्रालयापर्यंत केलेला पाठपुरावा, तसेच मुंबई उच्च न्यायालयात समाजाच्या वतीने घेतलेली ठोस भूमिका, ही त्यांच्या कार्यातील महत्त्वाची उदाहरणे आहेत.
गेल्या सलग २५ वर्षांपासून तालुकास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन, समाजाची स्वतंत्रपणे दोन वेळा जनगणना, आतापर्यंत तीन वेळा समाज संपर्क सूचीचे प्रकाशन, जिल्हा स्तरावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन, कोपर्डी (अहिल्यानगर) येथील पिडित अत्याचाराच्या विरोधात जिल्हा स्तरावर निषेध मोर्चाचे आयोजन,तसेच सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कार्याची व्यापकता अधोरेखित करतात.
याशिवाय समाजातील समाधीपूजा विधी, वृक्षारोपण, रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर, शैक्षणिक उपक्रम, युवक संघटन, सामाजिक एकोपा वाढविणे आणि समाजातील विविध प्रश्नांवर सकारात्मक व विधायक भूमिका घेण्यामध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
“हा सन्मान माझा एकट्याचा नाही…”
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना श्री. वसंत गोसावी म्हणाले,
“हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, गेल्या तीस वर्षांच्या समाजकार्याच्या प्रवासात साथ देणाऱ्या तरुण मित्रांचा, समाजबांधवांचा, १९९८ पासूनच्या तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांचा, माझ्या कुटुंबीयांचा आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा सामूहिक सन्मान आहे.”
त्यांच्या या सन्मानामुळे सिन्नर तालुक्यातील दशनाम गोसावी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून श्री. गोसावी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तीन दशकांची अविरत समाजसेवा, असंख्य सहकाऱ्यांची समर्थ साथ आणि समाजबांधवांचे प्रेम यांचा हा गौरवपूर्ण सन्मान ठरला आहे.

