
सिन्नर ( प्रतिनिधी). : श्री दशनाम गोसावी समाज संस्था सिन्नर, वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर आणि आई भवानी वृक्ष मित्र परिवार, सोनांबे यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील दशनाम गोसावी समाज समाधीभूमी, शिवधाम येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून परिसर हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात आला.श्री दशनाम गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास वनप्रस्थ फाउंडेशनचे अभिजीत देशमुख, इंजि. बोराडे, सचिन आडणे, संदीप आहेर तसेच आई भवानी वृक्ष मित्र परिवाराचे सोपान बोडके, सागर पवार, विनोद रोकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे देणगीदार तथा तालुका कृषी विस्तार अधिकारी संजय गिरी, माजी अध्यक्ष भानुदास गोसावी, रतनपुरी गोसावी, रविंद्र गिरी, जिल्हा प्रतिनिधी ईश्वर गोसावी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.परिसराचे पर्यावरणीय संतुलन आणि जैवविविधता जपण्याच्या उद्देशाने कडुलिंब, आवळा, बेल, चिंच, पिंपळ, करंजी, शिसव, बांबू, चंदन आदी विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. देशी वृक्षांचे संवर्धन करून भावी पिढीला स्वच्छ, निरोगी व हिरवाईने समृद्ध पर्यावरण देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
“वृक्षलागवड ही केवळ रोपे लावण्याची कृती नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी जीवनाची हिरवी शिदोरी निर्माण करण्याचा संकल्प आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी, खजिनदार छगन गोसावी, गुलाब गोसावी, राजेंद्र गोसावी, काशिनाथ गोसावी, संजय गोसावी आदींनी संयोजन केले.

