
सोनांबे, ( प्रतिनिधी )ता. २२ : धार्मिक परंपरेचे जतन करत स्वराज्यावरील प्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना जपणाऱ्या सिन्नरच्या गोसावी समाजबांधवांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने आयोजित ‘शंभूतीर्थ तुळापूर ते शिवतीर्थ रायगड अभिवादन यात्रा’ मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) उत्साहात प्रारंभ झाली. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महंत निश्चलपुरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ वाढवून यात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
“शंभूतीर्थ तुळापूर ते शिवतीर्थ रायगड ही स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन करणारी यात्रा आहे असे कौतुकास्पद उदगार खासदार वाजे यांनी व्यक्त केले. युवानेते उदयभाऊ सांगळे शुभेच्छा देताना म्हणाले की, छत्रपतींच्या विचारांना वंदन आणि ऐतिहासिक परंपरेचा जागर करणारा हा सोहळा आहे. सिन्नरच्या श्री दशनाम गोसावी समाज संस्थेने गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू ठेवलेला २४ सप्टेंबरचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा अद्वितीय आहे,” असे गौरवोद्गार युवानेते उदय सांगळे यांनी काढले.
गेल्या पंधरा वर्षांपासून संस्थेचे पदाधिकारी २४ सप्टेंबर रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदा या परंपरेला आणखी एक ऐतिहासिक सन्मान लाभला असून, राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला रायगडाचे पूजन करण्याचा मान सिन्नरच्या श्री दशनाम गोसावी समाज संस्थेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे यंदाची यात्रा विशेष महत्त्वाची ठरली आहे.
यात्रेपूर्वी शंभूतीर्थ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करून संस्थेचे पदाधिकारी रायगडाकडे रवाना होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष, पराक्रम आणि बलिदान यांचे स्मरण करत ही यात्रा तुळापूर ते रायगड असा ऐतिहासिक प्रवास करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. त्यानंतर २४ सप्टेंबर १६७४ रोजी महंत निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा राज्याभिषेक झाल्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या इतिहासातील विविध संदर्भांमध्ये आढळतो. या ऐतिहासिक स्मृतीशी जोडलेला २४ सप्टेंबरचा दिवस दशनाम गोसावी समाजासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. निश्चलपुरी गोसावी यांच्या ऐतिहासिक भूमिकेचे स्मरण करत संस्था या परंपरेत श्रद्धेने सहभागी होत आहे.या अभिवादन यात्रेत संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी, सरचिटणीस वसंत गोसावी, उपाध्यक्ष दौलत गोसावी, खजिनदार छगन गोसावी, माजी अध्यक्ष रवींद्र गिरी यांच्यासह गुलाबगिरी गोसावी, शरद गोसावी, विजय गोसावी, ब्रह्मगिरी गोसावी, सुभाष गोसावी, बाळासाहेब गोसावी, संदीप गोसावी, अशोक गोसावी, लालाभाऊ मुत्रक आदी सहभागी झाले आहेत.
२२ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या अभिवादन यात्रेची सांगता रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागाने होणार आहे. पंधरा वर्षांपासून जपलेली ही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.या अभिनंदन यात्रेस माजी अध्यक्ष रतनपुरी गोसावी, सचिन शेळके तसेच बारा बलुतेदार संघाचे मार्गदर्शक दत्ता गोळेसर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

