
नाशिक | प्रतिनिधी
“रक्ताची रक्ताला आली साद, माणसा माणुसकीला दे दाद…”
या भावनेतून गणेशोत्सवाचे औचित्य साधत दीपली नगर, नाशिक येथील आमल्या पॅरामाउंट सोसायटीच्या वतीने प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी २२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
गणपती बाप्पाच्या साक्षीने रक्तदान करताना मनात एक वेगळाच सात्त्विक भाव जागृत झाल्याची भावना रक्तदात्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीचा संदेश देणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी इंजिनीअर पराग पाटोदकर गुजराथी आणि सागर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून सोसायटीतील नागरिकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, आपल्या रक्तामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू केलेला हा उपक्रम पुढील वर्षी आणखी मोठ्या स्वरूपात राबविण्यात येईल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या आनंदाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत २२ रक्तदात्यांनी दिलेली माणुसकीची ही साद परिसरात कौतुकाचा विषय ठरली.

