
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०५ वा दिवस

आसक्तीचा संपूर्ण त्याग करण्याचे दोन मार्ग आहेत. पैकी पहिला अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांचा ईश्वरावर किंवा कसल्याही बाहेरील साहाय्यावर विश्वास नाही. त्यांना स्वतःच्याच कौशल्यावर किंवा साधनांवर भरवसा ठेवणे प्राप्त आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या, मनःशक्तीच्या आणि विवेकविचाराच्या जोरावरच त्यांना कार्य करावयाचे असते. त्यांना ठासून म्हणावे लागेल 'मी अनासक्त होईनच'. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे अशांचा मार्ग याहून भिन्न असतो. आणि तो त्या मानाने पुष्कळच सोपाही आहे. कर्माचे समस्त फल ते भगवंताच्या श्रीचरणी समर्पण करीत असतात. आणि म्हणून कर्म आचरूनही ते फलांवर आसक्त होत नाहीत. सारे त्या प्रभूचेच आहे, म्हणून समस्त फल प्रभूलाच अर्पण करतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास ४ शके १९४८
★ भाद्रपद पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६
★ पितृपक्ष प्रारंभ पौर्णिमा श्राध्द
★ १८२० बंगाल मधिल समाजसुधारक, तत्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ, उद्योजक इश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्मदिन.
★ १८९४ लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्मदिन
★ १९२३ सदाबहार हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते देव आनंद यांचा जन्मदिन.
★ १९३२ जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्मदिन.

