
नाशिक : आडगाव शिवारातील वृंदावन नगर येथील मधूशा एलाइट सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा संदेश देण्यात आला. कलाशिक्षक विजय चव्हाण व जयंत निकम यांच्या संकल्पनेतून यावर्षी सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असला, तरी विसर्जनामुळे जलप्रदूषणासह पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मधूशा एलाइट सोसायटीतील रहिवाशांनी यंदा शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केला.
विजय चव्हाण व त्यांचा मुलगा जयदीप यांनी स्वतः शाडू मातीची गणेशमूर्त्या तयार केल्या, तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक आरास करण्यात आली. विसर्जनासाठी सोसायटीच्या इमारतीखाली टबाचा वापर करून सुंदर ‘गणपती विसर्जन कुंड’ तयार करण्यात आले. फुलांची सजावट तसेच पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारी घोषवाक्ये लिहून कुंडाची सजावट करण्यात आली.
सोसायटीतील शाडू मातीच्या गणेशमूर्ती एकत्रितपणे विसर्जनस्थळी आणण्यात आल्या. गणरायाचे विधिवत पूजन व सपत्नीक आरती झाल्यानंतर भक्तिभावाने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निर्माल्य नदी, तलाव किंवा सार्वजनिक पाणवठ्यात न टाकता झाडांजवळ खड्डा करून त्यामध्ये टाकण्यात आले. त्यामुळे निर्माल्याचा योग्य पुनर्वापर होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला.
या उपक्रमामुळे उपस्थित गणेशभक्तांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती झाली. उपस्थित काही भक्तांनी “पुढील वर्षापासून आपणही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू,” अशी भावना व्यक्त केली.

यावेळी विजय चव्हाण, जयंत निकम, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, सोसायटीचे चेअरमन धीरज राणे, भास्कर मधे, राजू चव्हाण, ज्ञानेश्वर चिखले, अथर्व निकम, ओम राणे, दीपक चव्हाण, जयदीप चव्हाण यांच्यासह बालगोपाळ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
“भक्तीही जपूया आणि निसर्गही जपूया; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

