
नांदगाव, ( प्रतिनिधी )दि. २६ सप्टेंबर : म. वि. प्र. समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन. यू. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अध्यक्षीय मनोगतात प्रो. डॉ. एस. ए. मराठे यांनी पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच कला, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि लोकपरंपरांच्या संवर्धनास मोठी मदत होते, असे प्रतिपादन केले.

भूगोल विभागप्रमुख डॉ. सी. बी. निगळे यांनी जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. प्रतिभा जाधव यांनी ‘पर्यटनाचे बदलते स्वरूप आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
आधुनिक पर्यटनामध्ये ऑनलाइन बुकिंग, डिजिटल नकाशे, GPS, सोशल मीडिया, आभासी पर्यटन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर याविषयी डॉ. जाधव यांनी माहिती दिली. पर्यटनाचा विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रा. श्रीमती आवारे एस. एम. यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बी. एम. आहिरे यांनी आभार मानले. पर्यटन विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्याचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

