
नांदगाव | प्रतिनिधी
नंदुरबार येथील विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत नांदगाव स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध वयोगट व वजनगटांमध्ये खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करून नांदगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेत फाउंडेशनच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळ, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उल्लेखनीय यश मिळवले. त्यात एकूण आकरा विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यातील जन्मजय कांबळे, साक्षी सोनवणे, तनिष्का पांडे, रितू सोनस या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले.तसेच हूमेरा पठाण, कावेरी काळे, तनिष्का वडघुले, महेश खैरनार,सार्थक राऊत यांनी रजत पदक व सोनाली शिंदे सार्थक सोनवणे यांनी कांस्यपदक मिळवून नांदगाव चे नाव मोठे केले. या यशामुळे विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड होण्याचा मार्गही सुकर झाला आहे.
या यशाबद्दल नांदगाव स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज वडघुले प्रशिक्षक, मेघा पवार पदाधिकारी व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या अथक मेहनतीमुळे हे यश मिळाल्याची भावना प्रशिक्षकांनी व्यक्त केली. तालुक्यातील क्रीडाप्रेमींनीही विजेत्या खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

