
नाशिक :(. प्रतिनिधी ) गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात नाशिक परिसर दीड लक्ष अथर्वशीर्षाच्या आवर्तनांनी दुमदुमले. विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर व नाशिक येथील संचालकांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक संपूर्ण नाशिक शहरात होत आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी विजय नागरी पतसंस्थेचे विशेष कौतुक केले. गत तेहतीस वर्षांपासून विजय नागरी पतसंस्था समाजाच्या सेवेसाठी सज्ज आहे. दरवर्षी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण पतसंस्थेच्या शाखांमार्फत केले जाते. यावर्षी अथर्वशीर्ष पठणाची विक्रमी नोंद करण्यात आली. संगमनेर येथे एक लक्ष अथर्वशीर्ष पठण झाले तर नाशिक येथे 55 शाळांमध्ये 35 हजार विद्यार्थ्यांनी दीड लक्ष अथर्वशीर्षाचे पठण करून संपूर्ण नाशिक परिसर दुमदुमून टाकला. या स्तुत्य उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन व मेहनत घेत आहेत पतसंस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर आशुतोष माळी, पतसंस्थेचे चेअरमन सीए डॉ. पराग सराफ, आणि पतसंस्थेचे संचालक सीए डॉ. देवेंद्र बेलन. त्यांना विशेष सहकार्य करीत आहेत पतसंस्थेचे संचालक श्रीकांत वाघ आणि शिरीष भालेराव आणि नाशिक शाखेतील कर्मचारी राकेश गांगुर्डे, सोमेश कुलकर्णी, आदित्य जानोरकर. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते आणि अथर्वशीर्ष पठणामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये एकाग्र होऊ शकतात हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच पतसंस्थेने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. पतसंस्थेचे कौतुक नाशिक शहरातील सर्व मान्यवर करीत आहेत. विशेष उल्लेखनीय मान्यवर म्हणजे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अभय चोकसी, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे दिलीप फडके, लोकमान्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर तसेच केंब्रिज विद्यालय इंदिरानगरचे ट्रस्टी भारती रामचंद्रन, मानवधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे,टाइम्स ऑफ इंडियाचे नाशिक शाखा अधिकारी रूपेश शर्मा या सर्वांनी विजय नागरी पतसंस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विविध शाळांमध्ये अथर्वशीर्ष पठणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, गणेश स्तवन, गणेश चालीसा इत्यादी आगळ्यावेगळ्या कलाकृतींनी गणेशाची आराधना केली. अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण नाशिक शहरच भक्तिमय वातावरणाने भरून गेले. विजय नागरी पतसंस्थेच्या या उपक्रमाला विविध शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

