
नाशिक ( प्रतिनिधी ) पितृपक्षाचे औचित्य साधून नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने सिडको येथील कर्णबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सेवाकार्य व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खजूर व राजगिऱ्याच्या चिक्क्या, तसेच चप्पल/बूट स्टँड, किराणा व दैनंदिन वापराचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी आरोग्य जनजागृती आणि जीवनकौशल्य मार्गदर्शन करण्यात आले

. यावेळी ‘गुड टच–बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सौ. स्नेहल देव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सुरक्षित व असुरक्षित स्पर्श ओळखणे, स्वतःचे संरक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे याबाबत माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान सौ. प्रतिभा कोतकर यांनी मुलांशी संवाद साधत कवितेची आवड आणि कवितेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमास कार्यकारी समिती प्रमुख सौ. अलका येवले, सौ. रेखा धांडे, श्री. अनिल नाहर, श्री. राजेंद्र बाफना, श्री. संदीप देव आणि श्री. पी. एस. कोतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. “सेवा हीच खरी श्रद्धांजली आणि माणुसकी हाच खरा धर्म” या भावनेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
नमस्ते नाशिक फाउंडेशन
“जिथे कमी, तिथे आम्ही!”

