
किरण कुमार चव्हाण,पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा), नाशिक यांना निवेदन देताना अंनिसचे कार्यकर्ते.
नाशिक: ( प्रतिनिधी ) आश्विन किंवा चैत्र नवरात्रीत मंत्र सिद्धी केलेला काळा धागा उजव्या मनगटी बांधल्यास शरीरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.तसेच खूप प्रयत्न करूनही जी कामे मार्गी लागत नाही त्यात अचानक पणे यश मिळण्यास आरंभ होतो.
हाती घेतलेल्या सर्व कामात यशाचे मार्ग प्राप्त होतात. असा मेसेज सोशल मीडियातून प्रसारित करणाऱ्या फलज्योतिषावर कारवाई व्हावी , अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,मंतरलेला काळा धागा उजव्या मनगटात बांधल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि यशाचे मार्ग खुले होतात.सदर दावा करणाऱ्या फलज्योतिषाचे असे म्हणणे आहे की, मंत्र सिद्धी केलेला दिव्य काळा धागा रुपये नऊशे( ९००/-₹) ला मिळेल.हे पैसे बँक अकाउंट वर जमा केल्यावर पोस्टाने काळा धागा पाठवला जाईल.खरंतर पाच पैशाची किंमत नसणाऱ्या या काळ्या दोऱ्यासाठी नऊशे रुपयांची मागणी या फलज्योतिषाने केली आहे. रक्कम जमा करण्यासाठी जीपेचा अकाउंट नंबर मेसेजमध्ये नमूद केलेला आहे.
पोलीस आयुक्तांनी या दाव्याची सखोल चौकशी करून, त्यांचे बँक अकाउंट तातडीने सील करावे. अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.
लोकांमध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा आणि दैवी तोडग्यावर विश्वास ठेवण्याची मानसिकता यांचा गैरफायदा घेऊन या व्यक्तीने आजपर्यंत हजारो लोकांचे आर्थिक शोषण व फसवणूक केल्याची दाट शक्यता महाराष्ट्र अंनिसने व्यक्त केली आहे . जर हे फलज्योतिषी त्यांच्या या चमत्कार सदृश्य दैवी तोडगे व दाव्यावर ठाम असतील तर त्यांनी, त्यांचे, हे सर्व चमत्कार सदृश्य दावे, तोडगे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अटी- शर्ती, नियम पाळून आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करावेत.
आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर चमत्कार सदृश्य दैवी तोडग्यांची सिद्धता देणाऱ्या व्यक्तीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २१ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवलेले आहे, ते सिद्धता देणाऱ्यास मिळू शकते. पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे जाहीर आव्हान महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात आलेले आहे.
हे जाहीर आव्हान ते स्वीकारत असल्याचे पुढील सात दिवसात लेखी स्वरूपात महाराष्ट्र अंनिसला कळवावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की लोकांच्या धार्मिक, सांस्कृतिक सण,उत्सवाच्या काळात असे चमत्कार सदृश्य दावे, तोडगे करणारे अनेक भोंदू बुवा , विशेषतः पंचवटी परिसरात आजही असण्याची दाट शक्यता आहे.
तसेच पुढील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून पोलीस आयुक्तांनी आतापासूनच ह्या सर्व अंधश्रद्धायुक्त गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून असे गैरप्रकार घडणार नाहीत यासाठी पोलिसांची स्वतंत्र टीम तयार करून ती आत्तापासूनच कार्यरत ठेवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धांना समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर.गोराणे ,राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे , रंजन लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

