
पाडळी, ता. सिन्नर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील मुलींमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी येथे किशोरवयीन मुलींसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा मित्र संस्था व आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मुलींना पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, शारीरिक स्वच्छता, गुड टच आणि बॅड टच मधील फरक ओळखणे, तसेच सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर व विल्हेवाट या विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मुलींच्या मनातील गैरसमज दूर करत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी होते. युवा मित्र संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, “मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. युवा मित्र संस्थेने आमच्या विद्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसवून दिले असून, मुलींसाठी सातत्याने असे उपक्रम राबवून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.”
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून युवा मित्रच्या डायरेक्टर सौ. मनीषा पोटे, डेप्युटी मॅनेजर ऋत्वी मेहता व आनंदा शुक्ला यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींशी संवाद साधला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. टी. गिरी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. देशमुख यांनी केले तर आभार टी. के. रेवगडे यांनी मानले. यावेळी एम. एम. शेख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

