
नाशिक येथे संस्कार क्रांती पीठ फाऊंडेशनतर्फे सन्मान; मान्यवरांची उपस्थिती
अंदरसूल 🙁 प्रतिनिधी ) अंदरसूल येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ साबरे यांच्या अखंड पत्रकारितेतील योगदानाची आणि निष्णात वृत्तलेखनाची दखल घेत संस्कार क्रांती पीठ फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने त्यांना ‘संस्कार संजीवनी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथील मु. श. औरंगाबादकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध योगाचार्य प्रा. अशोकराव पाटील होते. प्रमुख मान्यवरांमध्ये नाशिक येथील प्रसिद्ध यशवंत क्लासचे संस्थापक, श्री स्वामी समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. यशवंत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक व कवी तथा माजी प्राचार्य प्रा. लक्ष्मण महाडिक, संस्कार क्रांती पीठ फाऊंडेशनचे संस्थापक, साहित्यिक, कवी व सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. विजय थोरात तसेच फाऊंडेशनच्या खजिनदार सेवानिवृत्त प्राचार्या प्रा. शैलजा वैद्य यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायाला उजेडात आणणे आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे ही तिची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या भूमिकेतून सातत्याने पत्रकारिता करणाऱ्या प्रकाशभाऊ साबरे यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.
संस्कार क्रांती पीठ फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रकाशभाऊ साबरे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव झाला असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

