
लेखक :- अशोक लक्ष्मण कुमावत, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, लेखक कवी, प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते सूत्रसंचालक नाशिक 9881856327
काल दिल्लीत एका BLO शिक्षकाने SIR च्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.मनाला प्रचंड वेदना झाल्या.या अगोदर रोज शेतकरी आत्महत्या पाठोपाठ कधी विदर्भ,कधी उत्तर महाराष्ट्र,कधी पुण्यात,कधी नाशिकमध्ये शिक्षक आत्महत्येचे प्रमाण वाढले.काही ठिकाणी तर त्याने संपूर्ण कुटुंबास सोबत घेऊन जीवन संपवले.याचे कारण फक्त आणि फक्त येथील शिक्षण व्यवस्था.अनावश्यक कामे,आर्थिक पिळवणूक,मानसिक ताण ,प्रशासकीय दडपण या सगळ्यांच्या ओझ्याखाली शिक्षक गाडला जातोय.
दुसरी बातमी सर्वत्र व्हायरल झाली की देशातील 95000 सरकारी शाळा बंद
याचा दुष्परिणाम म्हणून की काय काल एक क्लेशदायक बातमी पण वाचनात आली शिक्षण खात्यात स्वेच्छानिवृत्ती अर्जांचा ढीग. हे सर्व देशाचे शैक्षणिक भवितव्य आणि एकंदरीत भावी पिढीला काळोखाच्या खोल दरीत ढकलण्याचे षडयंत्र आहे.
“शाळा आहे का बाजार?” हा एका शिक्षकाचा आक्रोश नाही, तर संपूर्ण देशाच्या आत्म्याचा टाहो होऊ पहात आहे.
ज्या देशाने जगाला शून्य दिला, त्या देशात आज शिक्षणच शून्यावर आले आहे. ज्या महाराष्ट्राने फुले-शाहू-आंबेडकरांची शिक्षणक्रांती दिली, त्याच महाराष्ट्रात आज सरकारी शाळेचा कणा मोडून, तिचीच बदनामी केली जात आहे.
मंदिराचे कळस दिवसेंदिवस गगनाला भिडू पहात आहे आणि सरकारी शाळा मात्र शेवटची घटका मोजताना दिसतात.हा लेख कोणत्याही एका सरकारविरुद्ध नाही,किंवा पक्षाविरुद्ध,प्रशासनाविरुद्ध नाही तर हा लेख त्या व्यवस्थेविरुद्ध आहे जिने पिढ्यानपिढ्या शिक्षणाला गुणवत्ता सोडून फक्त आकडेवारी बनवले आहे.
गुरुकुल
जिथे माणूस घडायचा, फक्त नोकर नाही.व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा.
पूर्वीचे गुरुकुल म्हणजे फक्त शाळा नव्हती, ती एक जीवनपद्धती होती. तिथे वेद शिकवले जायचेच, पण सोबत शेती कशी करावी, झाड कसे लावावे, युद्ध कसे करावे, औषध कसे बनवावे हेही शिकवले जायचे. गुरु शिष्याला नुसते पुस्तकी ज्ञान देत नव्हता, तर जगण्याचे तंत्र उपलब्ध करून जीवनात सामावून घेत होता.
आश्रमात गायी होत्या, शेते होती, यज्ञ होता आणि श्रमप्रतिष्ठा होती. शिक्षण हे जीवनापासून तुटलेले ,विभक्त नव्हते. यातूनच गार्गी,मैत्रेयी सारख्या विदुषी घडल्या.आजचा विद्यार्थी पाऊस कसा पडतो हे पुस्तकात शिकतो, पण शेतात पाणी कसे अडवायचे हे त्याला माहित नाही. त्याला मोबाईलचे सर्किट माहित आहे, पण घरातला फ्यूज गेला तर तो गोंधळतो. कारण आम्ही शिक्षण आणि जीवन यांची फारकत केली आहे.
१८३५ मध्ये इंग्रज अधिकारी मेकॉलेने एक पत्र लिहिले की “भारतात अशी एक पिढी तयार करा जी रंगाने भारतीय असेल, पण मनाने इंग्रज असेल. जी आपली भाषा, आपली संस्कृती विसरून आमची कारकुनी करेल.” दुर्दैव असे की स्वातंत्र्याला ७८ वर्षे झाली तरीही आपण त्याच कारकुनीच्या पिंजऱ्यात अडकलो आहोत. आजही आपली मुले कलेक्टर होण्यासाठी शिकतात, शेतकरी होण्यासाठी नाही. साहेब होण्यासाठी शिकतात, माणूस होण्यासाठी नाही.
सरकारी शाळांचा मोडलेला कणा : एक षडयंत्र
महाराष्ट्रात एकेकाळी जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गावाची शान होती. त्या शाळेतून आयएएस, डॉक्टर, शिक्षक घडले. आज त्याच शाळेच्या भिंतीवर लिहिले आहे – “इथे पटसंख्या कमी आहे, शाळा बंद होणार.”
हा योगायोग आहे का नियोजन?
पहिले शाळेला शिक्षक द्यायचे नाहीत. एका शिक्षकावर तीन वर्ग. तो शिकवणार की हजेरी भरणार? मग शाळेत सुविधा द्यायच्या नाहीत. प्यायला पाणी नाही, बसायला बेंच नाही, लघवीला स्वच्छ संडास नाही. मुलगी सातवीत आली की शाळा सोडते, कारण संडास नाही. मग म्हणायचे – “बघा, सरकारी शाळेत कोण येत नाही.” आणि मग त्या शाळेची आणि शिक्षकांची बदनामी करून खाजगी शाळांचे पेव फोडायचे. शिक्षणाचा बाजार मांडायचा. हा तर काही लोकप्रतिनिधी यांनी सर्रास सपाटा चालवला आहे.
आज पालक कर्ज काढून मुलाला इंग्रजी मीडियमच्या खाजगी शाळेत टाकतो, जिथे फी किमान ५० हजार आणि लाखो आहे, पण शिक्षकाला पगार मात्र ८ हजार आहे. आणि सरकारी शिक्षक, ज्याला पगार चांगला आहे पण त्याला शिकवूच दिले जात नाही.त्याची अखंड बदनामी करण्याचं काही यंत्रणेने जणू विडाच उचलला आहे.
अपुऱ्या सुविधा आणि अपुरा शिक्षक वर्ग
दोन हातांनी समुद्र कसा रोखणार?
आकडेवारी बघा. महाराष्ट्रात आजही १८ हजारांहून अधिक शाळा एकशिक्षकी आहेत. एका शिक्षकाने पहिली ते चौथीचे चार वर्ग सांभाळायचे, सकाळी पोषण आहाराची नोंद करायची, दुपारी शालार्थमध्ये हजेरी भरायची,इतर ऑनलाईन ऑफलाईन रिपोर्ट सादर करायचे, या ना त्या साईटवर वृक्षारोपण,गृहभेटी,असे अनेक फोटो, व्हिडीओ अपलोड करायचे,संध्याकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा BLO चे काम करायचे. यातून तो शिकवणार कधी?बर नाही केले तर यंत्रणा सारखी मागे वेताळासारखी लागलेली.त्याला कौटूंबिक सुख हे शिल्लकच ठेवले नाही.
भौतिक सुविधा म्हणजे तर थट्टा आहे. अनेक शाळांमध्ये अजूनही वीज नाही. जिथे आहे तिथे दिवे नाहीत. डिजिटल शाळा म्हणून टॅब दिले, पण रेंज नाही. स्मार्ट बोर्ड दिला, पण शिकवणारा शिक्षकच ट्रेंड नाही. प्रयोगशाळा आहे, पण रसायन नाहीत. ग्रंथालय आहे, पण पुस्तके कुलूपबंद आहेत.
आणि कुशल शिक्षक? डीएड, बीएड झालेला तरुण १० वर्षे TET, CTET, TAIT देत बसतो. त्याची उमेद संपते. आणि जेव्हा तो लागतो, तेव्हा त्याला कळते की त्याचे खरे काम शिकवणे नाहीच.
शिक्षक : शिकवणारा नाही, तर कारकुन झालेला बाप
आजच्या शिक्षकाची अवस्था बघा. तो सकाळी १० ते ५ शिकवत नाही, तो सकाळी १० ते ५ डेटा भरतो.
निवडणूक आली की BLO, जनगणना आली की प्रगणक, साथ आली की सर्व्हे, शासकीय योजना आली की फोटो काढणारा, आधार आला की नोंदणी करणारा. पोषण आहार, गणवेश वाटप, पुस्तक वाटप, शिष्यवृत्ती फॉर्म, जातीचे दाखले गोळा करणे, UDISE, शालार्थ, SARAL… ही यादी संपत नाही.
एक प्रभारी मुख्याध्यापक मला म्हणाले – “सर,माझ्याकडे पाचवीचा वर्ग आहे .नवोदय ,स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन आहे,मी गेल्या महिन्यात फक्त 3 दिवस शिकवले, बाकी दिवस मी सतत ऑफिसमध्ये कंबरमोड कामे करत होतो.
ज्या देशात शिक्षकाला शिकवू दिले जात नाही, त्या देशात पिढी कशी घडणार? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता म्हणायचे, पण त्याला शिपाई बनवले आहे. त्याचा आत्मसन्मानच मारला आहे.
धोरणांची रद्दी आणि आयोगांचे अपयश
देश स्वतंत्र झाला तेव्हाच्या १९४८ पासून राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग, कोठारी आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८, १९८६, २०२०. कागदावर,विविध प्रकारच्या शैक्षणिक समित्या ,श्वेतपत्रिका प्रत्येक धोरण सोनेरी आणि गोंडस जन्माला घालतात पण प्रत्यक्षात मात्र काय?डोंगर पोखरून उंदीर काढायचा अशी अवस्था,जशी चक्रव्युहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती निर्माण केली आहे.
कोठारी आयोगाने सांगितले – शिक्षणावर GDP च्या ६% खर्च करा. आज ७८ वर्षांनीही आपण २.९% वर आहोत. NEP २०२० ने सांगितले – मातृभाषेतून शिक्षण, कौशल्यावर भर. पण प्रत्यक्षात इंग्रजीचा बाऊ वाढला, कौशल्य म्हणून फक्त पॉवरपॉईंट शिकवला जातो.
धोरणे दिल्लीत बनतात, आणि ती शेताच्या बांधावरच्या शाळेत कधीच पोहोचत नाहीत. कारण धोरण बनवणारा कधीच जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलेला नसतो त्यामुळे मुळापर्यंत कधीच पाणी पोहोचले नाही.
जीवनाशी तुटलेला संबंध :
मुलांकडे ढीगभर पदव्या आहेत , पण जगण्याचे शहाणपण हरवले आहे.
आजचा दहावीचा मुलगा पायथागोरसचे प्रमेय लिहितो, पण बँकेत खाते कसे काढायचे हे त्याला माहित नाही. त्याला अकबराचा इतिहास माहित आहे, पण शेजारच्या ग्रामपंचायतीत अर्ज कसा करायचा हे माहित नाही. त्याला ऑक्सिजनचे सूत्र माहित आहे, पण झाड कसे जगवायचे हे माहित नाही.
शिक्षणाने त्याला मार्क दिले, पण जगण्याचे भान दिले नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढते आहे. पदव्या हातात आहेत, पण हाताला काम नाही. कारण शिक्षणाने कारकून तयार केले, निर्माते नाही.
भ्रष्ट व्यवस्थेने मारलेला शेवटचा खिळा – पेपरफुटी आणि शालार्थ
आणि या सगळ्यावर कळस म्हणजे भ्रष्टाचार.
पेपरफुटी. एका पेपरफुटीने लाखो प्रामाणिक मुलांच्या स्वप्नांचा खून होतो. जो रात्रंदिवस अभ्यास करतो, तो घरी रडत बसतो, आणि जो ५ लाख देतो, तो अधिकारी होतो. मग सामान्य माणसाचा शिक्षणावरचा विश्वास कसा राहणार?
शालार्थ घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, बदली घोटाळा. महाराष्ट्रात हजारो बोगस शिक्षकांचे पगार निघाले, हे उघड झाले. ही रक्कम कोट्यवधींची आहे. हा पैसा शाळेच्या इमारतीवर लागायला हवा होता, तो दलालांच्या खिशात गेला.
जेव्हा शिक्षणातच भ्रष्टाचार येतो, तेव्हा समाजाच्या मुळावरच घाव पडतो.
शेवट – उपाय काय?
शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही.
तरीही आशा संपलेली नाही. कारण अजूनही काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे शिक्षक आहेत जे स्वतःच्या पैशाने मुलांना पुस्तके देतात. अजूनही काही गावांत पालक श्रमदान करून शाळा रंगवतात.दिलीप वारे गुरुजीं, रणजीत डीसले गुरुजी,केशव गावित यांच्या सारखे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि विद्यार्थी निर्माण करणारे आदर्श शिक्षक आजही आहेत.त्यांना बदनाम कसे करता येईल याचाच आराखडा कुणीतरी बेनामी यंत्रणा तयार करून राबवते .
उपाय एकच – शिक्षणाला पुन्हा जीवनाशी जोडा.
शिक्षकाला फक्त शिकवू द्या.अशैक्षणिक कामातून मुक्त करा.
सरकारी शाळा म्हणजे गरिबांची शाळा नाही, तर गावाची शाळा आहे, हा सन्मान परत द्या.
खर्च वाढवा. ६% चे वचन पाळा.
स्थानिक भाषा, स्थानिक कौशल्य, स्थानिक गरजा यावर आधारित अभ्यासक्रम बनवा.
पेपरफुटी करणाऱ्याला देशद्रोहाचा गुन्हा लावा.
कबीर म्हणतात- “पोथी पढी पढी जग मुआ, पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय।”
पुस्तके वाचून कोणी पंडित होत नाही, प्रेमाचे अडीच अक्षर शिकला तोच खरा ज्ञानी.
शिक्षणाला प्रेम हवे, पैसा नाही. शिक्षणाला माणुसकी हवी, बाजार नाही. आणि शिक्षकाला सन्मान हवा, फक्त सहानुभूती नाही.
नाहीतर उद्या इतिहास लिहिला जाईल – “एक देश होता, ज्याने गुरुकुलात जगाला ज्ञान दिले, आणि बाजारात आपले भविष्य विकून टाकले.”
हाच तो वाभाडे निघालेला आरसा आहे. आता तरी आपण त्यात पाहणार का?
सर्व विचार लेखकाचे वैयक्तिक मत आहे.
लेखक- अशोक लक्ष्मण कुमावत
राष्ट्रपती पुरस्कार विजेते
नाशिक 9881856327

