
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. या किल्ल्यावरील तुळजाभवानी मातेचे मंदिर महाराष्ट्रातील श्रद्धेचे एक महत्त्वाचे स्थान आहे. जावळीचा प्रदेश स्वराज्यात आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भोरप्या डोंगरावर किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला. इ.स. १६५६ च्या सुमारास प्रतापगडाच्या बांधकामास सुरुवात झाली. या किल्ल्याच्या उभारणीची जबाबदारी मोरोपंत पिंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. या भेटीत अफझलखानाचा वध झाला आणि प्रतापगडाला स्वराज्याच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी मातेवर विशेष श्रद्धा होती. तुळजापूरची तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवता मानली जाते. प्रतापगडावर देवीची स्थापना करून पूजाअर्चेची व्यवस्था करण्याची महाराजांची इच्छा होती. अफझलखानाच्या वधानंतर देवीने महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन प्रतापगडावर आपली स्थापना करण्यास सांगितले. त्यानंतर महाराजांनी गंडकी पाषाणातून देवीची मूर्ती घडवून तिची प्रतिष्ठापना केली. छत्रपती राजाराम महाराजांचे १० जानेवारी १६९५ रोजीचे वतनपत्र मूर्तीच्या निर्मितीविषयी महत्त्वपूर्ण माहिती देते. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मंबाजी गोमाजी नाईक पानसरे हे पर्वताचा राजा लीलासेन याच्या राज्यापर्यंत गेले. तेथे त्रिशूळ गंडकी, श्वेतगंडकी आणि सरस्वती यांच्या संगमाजवळून योग्य पाषाण आणण्यात आला. त्याच प्रदेशातील कुशल शिल्पकारांनी मूर्ती तयार केली. महाराजांनी राजगडावर मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मोरोपंत पिंगळे प्रधान यांच्यासमवेत ती प्रतापगडावर पाठवून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंबाजी पानसरे यांच्याकडे प्रतापगडावरील तुळजाभवानी देवस्थानाच्या भोपेपणाची मुतालिकी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी वंशपरंपरेने सोपवण्यात आली. ही व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही चालू राहिली आणि छत्रपती राजाराम महाराजांनी ती पुढे कायम ठेवली. देवीची पूजा, उत्सव आणि देवस्थानाची व्यवस्था पूर्वापार परंपरेनुसार चालविण्याचे अधिकार मंबाजी पानसरे व त्यांच्या पुत्रपौत्रांना देण्यात आले. तुळजाभवानी मातेने शिवाजी महाराजांच्या वंशाला सत्तावीस पिढ्यांपर्यंत राज्याचे वरदान दिले. स्वामींच्या वंशाकडे राज्य असेपर्यंत पानसरे घराण्याची देवस्थानावरील मुतालिकी चालू राहील असाही उल्लेख पत्रात येतो.
प्रतापगडावरील भवानीमातेची मुख्य मूर्ती काळ्या गंडकी पाषाणातील अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरूपाची आहे. देवीच्या आठ हातांत विविध आयुधे असून मुकुटावर शिवलिंग आणि दोन्ही बाजूंना सूर्य-चंद्र यांच्या प्रतिमा आहेत. मुख्य मूर्तीशेजारी तुळजापूरच्या भवानीमातेची प्रतिकृती आहे. गर्भगृहातील स्फटिकाचे शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनातील आहे. मंदिरासमोर दोन दगडी दीपमाळा असून जवळ नगारखाना आहे. देवीला दिवसातून तीन वेळा नैवेद्य दाखविला जातो. पौर्णिमेला गोंधळ, आरती आणि पालखीची परंपरा आहे. देवीचा ललिता पंचमी हा प्रमुख उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीच्या पूजेसाठी आणि उत्सवांसाठी व्यवस्था केली होती. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकापूर्वी प्रतापगडावर येऊन त्यांनी भवानीमातेचे दर्शन घेतले आणि तीन मण वजनाचे सुवर्णछत्र अर्पण केले. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत इ.स. १८२० च्या सुमारास मंदिरासमोर लाकडी मंडप बांधण्यात आला होता. मंदिराच्या नगारखान्याचा इ.स. १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. प्रतापगडावरील श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानीभक्तीचे, स्वराज्याच्या इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
संदर्भ :-
सभासद बखर
छत्रपती राजाराम महाराजांचे वतनपत्र, १६९५

