
अवघ्या ३१ वर्षांचं आयुष्य आणि जेमतेम दशकभराची अभिनय कारकीर्द… स्मिता यांच्या अभिनयातील सच्चेपणा आणि पडद्यावर साकारलेल्या कणखर व्यक्तिरेखा आजही मनाला भिडतात. काळाच्या पडद्याआड जाऊन जवळपास चार दशकं उलटली, तरी रसिकांच्या मनातील त्यांचं स्थान तसूभरही कमी झालेलं नाही.
१७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात जन्मलेल्या स्मिता पाटील यांनी वृत्तनिवेदिका म्हणून मुंबई दूरदर्शनवर कारकिर्दीची सुरुवात केली. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांच्यातील अभिनयगुण ओळखून चरणदास चोर या चित्रपटातून त्यांना संधी दिली. अर्थातच स्मिताने या संधीचं सोनं केलं.
१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या भूमिका या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाला नवी उंची दिली. अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांनी एका स्त्रीचा मानसिक संघर्ष, घुसमट आणि स्वातंत्र्याची ओढ विलक्षण ताकदीने साकारली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर चक्र चित्रपटातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अम्माच्या भूमिकेसाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
मंथन, आक्रोश, बाजार, मंडी, अर्ध सत्य आणि मिर्च मसाला यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी समाजातील वास्तव आणि स्त्रियांच्या संघर्षाला प्रभावीपणे पडद्यावर आणलं.
मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. जब्बार पटेल दिग्दर्शित जैत रे जैत आणि उंबरठा हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कलाकृती ठरले.
नमक हलाल, शक्ती, आखिर क्यूँ, आज की आवाज आणि अमृत यांसारख्या व्यावसायिक चित्रपटांतून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. नमक हलालमधील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं आज रपट जाये तो हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
स्मिता पाटील यांच्या अभिनयाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना. अनेकदा एकही संवाद न बोलता त्या केवळ नजरेतून व्यक्तिरेखेचं संपूर्ण भावविश्व उलगडून दाखवत. पडद्यावरील स्त्री केवळ सुंदर दिसण्यासाठी नसून तिचे स्वतःचे विचार, भावना, संघर्ष आणि स्वतंत्र अस्तित्व असतं, हे त्यांनी आपल्या भूमिकांमधून अधोरेखित केलं.
१३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचं अकाली निधन झालं…आजही स्मिता पाटील यांनी साकारलेल्या कणखर स्त्री व्यक्तिरेखा तितक्याच प्रभावी वाटतात.
आपल्या अभिनयातून भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी देणाऱ्या महान अभिनेत्री स्मिता पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ❤️🌹

