
सेलू : ( प्रतिनिधी ) बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पालक-शिक्षक सभा (PTM) व नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पालक-शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पालक मनोज भरडे, कैलास उबाळे आणि संदीप लहाने यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमांतर्गत आई-मुलांचा विनाअग्नी पाककला स्पर्धा, ‘सौ. नवरात्री क्वीन’ पारंपरिक वेशभूषा रॅम्प वॉक आणि वडील विरुद्ध विद्यार्थी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या उपक्रमांतून कौटुंबिक स्नेह, सांस्कृतिक परंपरा, सर्जनशीलता आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
प्राचार्या रितू श्रीवास्तव मॅडम यांनी पालक-शिक्षक समन्वय हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि कलागुण विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
संस्थेच्या अध्यक्ष भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. अशा कार्यक्रमांमुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक जतन आणि कौटुंबिक सहभाग यांचा संगम साधणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

