
नाशिक:- (प्रतिनिधी ) मानवी जीवनात असलेल्या नात्यांमधील अंतर्गत ताणतणाव यांच्या बंध आणि अनुबंध यांचा वेध घेताना ‘आठवणींच्या श्रावणसरी’मधून आत्मा, जन्म आणि पारलौकिक जीवनाचे मुक्तचिंतन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन शैलेश पाटोळे यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात २९०वे पुष्प ‘आठवणींच्या श्रावणसरी’ या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते.
शैलेश पाटोळे पुढे म्हणाले की, या कथासंग्रहातून सुखदुःखाच्या अनेक छटा मांडण्याचा प्रयत्न केला असून जीवनात अनपेक्षितपणे प्रकटणाऱ्या अनेक साध्यासरळ घटनांचे रूपरंग कसे असते, याचे चित्र मांडण्यात आले आहे. जगण्याची केवलवाणी तडफड आणि संवेदनांची पडझड विविध कथांमधून मांडताना जीवनानुभवांचा मागोवा घेण्यात आला आहे. नात्यांची घुसमट, प्रेम, भावनेतली अबोलता, विरह, कुटुंबीय व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बालपणापासून तर आयुष्याच्या अखेरपर्यंत घडणाऱ्या विविध गोष्टींची उकल या कथासंग्रहात आहे, असेही ते म्हणाले.
साहेबराव उगले आणि माणिकराव गोडसे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुनंदा पाटील यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.४) डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी हे ‘जाणता हृदय हे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

