
सिन्नर :(प्रतिनिधी ,) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय,सिन्नर येथे गुणवंत विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव करणारा भव्य गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना संपूर्ण विद्यालय परिसर अभिमान,प्रेरणा आणि आनंदाच्या भावनेने भारावून गेला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सारंग इंगळे तसेच डॉ. दीप्ती लेले-सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.श्रीराम क्षत्रिय होते.याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका माधवी पंडित,मेघाताई गुजर,विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे तसेच शिक्षक प्रतिनिधी प्रिया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुवर्णा सोनवणे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थिनींच्या यशामागील शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनींच्या परिश्रमांचा गौरव केला.प्रमुख अतिथी डॉ. दीप्ती लेले-सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना,”मोठी स्वप्ने पाहा,स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत संघर्ष,आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर यश संपादन करता येते,हे प्रभावी उदाहरणांसह सांगितले.डॉ. सारंग इंगळे यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना,”मेहनत, संघर्ष आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर स्वतःचे,आपल्या आई-वडिलांचे आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल करा,” असा मोलाचा सल्ला दिला.श्रीराम क्षत्रिय यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास,सकारात्मक विचार आणि अथक प्रयत्न यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. “जीवनात कधीही निराश होऊ नका;गुणवत्तापूर्ण संघर्षच यशाचा खरा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यानंतर गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास माजी मुख्याध्यापक,आजी – माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिन्नर शहरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या कुलकर्णी व निलिमा दुसाने तर प्रिया कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेला हा गुणगौरव सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील.

