कवी, लेखक, अभिनेता
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
माजी प्राचार्य
प्रा.जयंत शां. रायबोर्डे
बुलडाणा.

" शब्दांच्या तपश्चर्येचे आणि आदर्श अध्यापनातून आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे अर्थात आदर्श शिक्षकाचे अभिष्टचिंतन ॥ साहित्य हे केवळ शब्दांचे जाळे नसते, तर ते समाजाच्या जिवंत वेदनांचे, आशेचे आणि परिवर्तनाच्या स्वप्नांचे प्रतिबिंब असते.अशा साहित्याची निष्ठेने साधना करणाऱ्या कवीचा - साहित्यिकाचा आजचा हा क्षण फक्त वैयक्तिक आनंदाचा राहत नाही.तो इतर साहित्यिकांना आणि शिक्षकांनाही आनंद देणारा असतो. अमरावतीच्या साहित्यिक वातावरणात असा एक अभिमानाचा क्षण अवतरला आहे.

त्यांच्या दीर्घकाळच्या साहित्यसेवेचा, मूल्यनिष्ठ विचारांचा, परिवर्तनवादी लेखनाचा व त्यांच्यातील आदर्श शिक्षकाचा जणू हा वाढदिवस आहे असे मला वाटते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक योगदान अत्यंत भरीव आणि प्रेरणादायी आहे. सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक विषयांवरील त्यांची अकरा पुस्तके प्रकाशित झालेली असून ‘निखारा’ आणि ‘अभंग तरंग’ हे दोन परिवर्तनवादी काव्यसंग्रह त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यांच्या लेखनातून समाजातील अस्वस्थ वास्तव, अन्यायाविरुद्धचा आवाज आणि परिवर्तनाची आस ठळकपणे प्रकट होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनातील कवी संमेलनांतून त्यांनी आपल्या परिवर्तनवादी कवितांचे व काव्यगीतांचे दमदारपणे सादरीकरण केलेले आहे. तथा अनेक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी हे परिवर्तनवादी विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये अनुभवांची खोली आहे, तर सादरीकरणात प्रामाणिक तळमळ आहे. त्यामुळेच त्यांची कविता श्रोत्यांच्या मनात घर करून राहते तसेच स्वतःच्या मुलाला जसे पालक घडवितात तसे त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना घडविले व आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेतून महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांना घडविले आणि एक आदर्श शिक्षक कसा असतो हे स्वआचरणातून जगाला सांगितले व विविध प्रबोधनमालेतून सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन तळमळीने ते आजही करीत आहेत.”असे विचार ज्यांच्या विषयी खानदेश येथील ‘खान्देश माझा’चे आदर्श संपादक दीपक पवार यांनी व्यक्त केले ते साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची आज पासष्टी.
तसेच “सत्काराला पात्र असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व, सर्वांचे मन स्वकर्तृत्वाने जिंकणारे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य करण्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्त्व, साचेबंदपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच नव्हता तर सरळ मार्गांनी जाऊन सतत कार्य करीत राहणे हा त्यांचा स्वभाव, भाऊसाहेबांच्या विचारांचा परिसासारखा स्पर्श झाल्यामुळे विविध शैक्षणिक प्रबोधनमालेतून भाऊसाहेबांचे आदर्श विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. “आदर्श अभ्यासाचे तंत्र” या स्वतः प्रकाशित केलेल्या पुस्तकातून त्यांनी शैक्षणिक कार्य केले. त्यांच्या या सर्वच क्षेत्रातील कार्याचा सन्मान राष्ट्रीय व राज्यस्तरीय २२ पुरस्कारांनी आजपर्यंत करण्यात आला. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याला सेवानिवृत्तीनंतर गती प्राप्त होऊन त्यापुढील त्यांचे जीवन आरोग्यदायी व सुखमय होवो ही सदिच्छा!”
असे भावपूर्ण उद्गार मा. प्राचार्य श्री केशवराव रामकृष्णराव गावंडे (सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) यांनी दि. ०४/०९/२०१९ ला निरोप व सेवाकार्य गौरव समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्यांच्या विषयी अध्यक्षपदावरुन काढले ते अष्टपैलू आदर्श शिक्षक म्हणजे प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले.
माझे स्नेही अभंगकार व समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या दि.२ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वची अर्थात कर्तृत्वाची ओळख अधोरेखित करण्यासाठी केलेला हा माझा लेखप्रपंच .
सर्वप्रथम सरांचे ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ।। शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत प्रा. अरुण बा. बुंदेले दि.३१ ऑगस्ट, २०१९ ला नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या कर्तव्याची सुरुवात जरुड, ता. वरुड, जि. अमरावती येथून दि. १३/०८/१९८८ ला झाली होती. त्यांनी ३१ वर्षे १९ दिवस सेवेत राहून हजारो विद्यार्थ्यांना घडविले आणि आज सेवानिवृत्तीच्या सात वर्षांनंतरही त्यांचे हे कार्य शैक्षणिक प्रबोधनमालेतून सुरूच आहे.
कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व
समाजसेवकांना पुरस्कार:-
एम.ए. (मराठी), बी.एड., एम.फिल. (मराठी) झालेल्या प्रा. अरुण बा. बुंदेले यांचा जन्म दि. २ ऑगस्ट, १९६१ रोजी अचलपूर, जि. अमरावती या ऐतिहासिक नगरीमध्ये झाला. त्यांचे वडील आदर्श नगरसेवक कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले व आई समाजसेविका कै. मैनाबाई बाबाराजी बुंदेले यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न विविध प्रबोधनमालेतून सन १९९४ पासून आज सेवानिवृत्तीनंतरही ते करीत आहेत. त्यासाठी त्यांनी “कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करुन त्याद्वारे ते सामाजिक , शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम राबवितात आणि आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ “कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक” व “कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले स्मृती पारितोषिक” रोख रक्कम, सन्मानपत्र, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तथा २६ जानेवारी गणराज्य दिनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करतात. त्यांनी आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमरावती, नांदगाव खंडेश्वर, बुलढाणा, अकोला, असदपूर,साऊर येथील शाळांना पाच व दहा हजारांची देणगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांसाठी दिलेली आहे. या देणगीच्या व्याजातून दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी पारितोषिक देण्यात येते. तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी स्वतःच्या या प्रतिष्ठानतर्फे कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांना कै. बाबारावजी बुंदेले राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार सन्मानपूर्वक देतात.
अशाप्रकारे कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील समाजसेवकांचा सत्कार करून प्रा. अरुण बुंदेले यांनी समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे.
विविध अध्यापन पद्धतींचा उपयोग करणारे आदर्श शिक्षक
इयत्ता अकरावी व बारावीला मराठी विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांची मराठी विषयात अभ्यासाची गोडी वृद्धिंगत करण्यासाठी चित्र अध्यापन पद्धती, अभिनय गायन अध्यापन पद्धती, नाट्यीकरण अध्यापन पद्धती, व्याख्यान (मुद्देसूद) अध्यापन पद्धती, कथन अध्यापन पद्धती, मार्गदर्शनपर अध्यापन पद्धती, कृतियुक्त अध्यापन पद्धती, चर्चा अध्यापन पद्धती अशा विविध अध्यापन पद्धतीचा उपयोग करून प्रभावी अध्यापनातून त्यांनी आदर्श विद्यार्थी घडविले आहेत.
मराठी शुद्धलेखन व वळणदार हस्ताक्षर
प्रकल्पातून शिक्षण:-
इयत्ता अकरावीमधील प्रवेशित विद्यार्थ्यांची मराठी वर्णमालेची व वळणदार हस्ताक्षरांची परीक्षा घेऊन परीक्षेतील असमाधानकारक उत्तरामुळे दुःखी न होता विद्यार्थ्यांच्या सहमतीने दोन रेषेच्या वहीत "मराठी शुद्धलेखन प्रकल्प व वळणदार हस्ताक्षर प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा खचलेला मूळ पाया पक्का करुनच मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा ते दरवर्षी सुरुवात करीत असत. या प्रकल्पांचा फायदा विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीतच नव्हे तर पुढील शिक्षणासाठी अतिशय चांगल्याप्रकारे झालेला आहे, असे त्यांचे माजी विद्यार्थी कथन करतात.
वाचन संस्कृती प्रकल्पातून राबविणारे शिक्षक :-
."वाचन संस्कृती" वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी शाळेत "आदर्श वाचन प्रकल्प" सुरु केला, तर ग्रंथालयात "वाचाल तर वाचाल हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये "वक्तृत्व कलेची" गोडी निर्माण व्हावी म्हणून सरांनी "आदर्श भाषण प्रकल्प" राबविला. भाषणासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले वर्षभरातील थोरांच्या जयंती-पुण्यतिथीच्या कार्यक्रमात वक्तृत्व व काव्यस्पर्धेचे आयोजन करुन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पुस्तके देऊन त्यांचा गौरव केला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेची आवड निर्माण होऊन विविध संस्था व शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक त्यांच्या विद्याथ्यांनी प्राप्त केलेले आहेत .
आदर्श लेखन प्रकल्पातून विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची प्रेरणा निर्माण करणारे शिक्षक :-
प्रा. बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी "आदर्श लेखन प्रकल्प" सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनकलेची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या विविध विषयावरील लेख व कविता शालेय प्रेरणा हस्तलिखितामध्ये दरवर्षीच असत. ज्याचे विमोचन शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवात २७ डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते होत होते. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांच्या कविता त्यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित करुन विद्यार्थ्यांमध्ये "काव्यलेखनाची प्रेरणा" निर्माण केली. त्यातूनच दरवर्षी दि. २७ डिसेंबर ला होणाऱ्या डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवातील स्नेहसंमेलनामध्ये "विद्यार्थ्यांचे वऱ्हाडी-विनोदी कविसंमेलन" दरवर्षी यशस्वीरित्या त्यांनी आयोजित केले होते.
आदर्श निबंध लेखन प्रकल्प : –
विद्यार्थ्यांसाठी “आदर्श निबंधलेखन प्रकल्प” राबवून निबंध लेखनाची कला शिकवून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी आदर्श निबंध लेखनाची गोडी निर्माण केली. त्यासाठी त्यांनी “आदर्श निबंधलेखन पुस्तिका” प्रकाशित केली.
‘आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेची’विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धिसाठी निर्मिती व सादरीकरण : –
प्रा. बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून "आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला " या शैक्षणिक कार्यक्रमाची १९९४ साली निर्मिती केली. या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांनी सन १९९४ पासून स्वशाळेसोबतच विदर्भातील शेकडो शाळा-महाविद्यालयात व-हाडी विनोदी भाषेत केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा?, अभ्यास किती करावा?, नियमित अभ्यासाच्या आदर्श वेळापत्रकाचे महत्त्व, वाचनाचे प्रकार व महत्त्व, पाठांतराचे महत्त्व, आत्मविश्वासाचे महत्त्व, कॉपीमुक्त परीक्षेचे महत्त्व, आदर्श उत्तरपत्रिका कशी सोडवावी?, प्रावीण्याचे गुपित या आणि अशा ३५ मुद्यांचे सादरीकरण "भद्याची माय" या दोन पात्री एकांकिकेसह व "बारावीची शकुनी" या नकलेसह शेकडो शाळा, महाविद्यालयातून करुन हजारो विद्यार्थ्यांना घडविले. विशेष म्हणजे "भद्याची माय" या दोन पात्री एकांकिकेत ते भद्याच्या मायची भूमिका स्वतः स्त्रीवेशात शाळा-कॉलेजात करीत तर "बारावीची शकुनी" या नकलेमध्ये बारावीच्या शकुनीची स्त्री भूमिका स्वतः मुलीच्या वेशात ते करीत असत. त्यांचा हा कार्यक्रम काही शाळांमध्ये मी सुद्धा बघितलेला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा येथे मा. प्राचार्यांनी प्रा. बुंदेले यांच्या या "आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेचे" आयोजन केले होते. तेव्हा विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही सरांचा कार्यक्रम बघून मंत्रमुग्ध झाले होते तसेच नांदगाव खंडेश्वर, नेरपरसोपंत, अमरावती, वरुड, सावनेर, चिखली, पैठण, आपेगाव, अकोला, यवतमाळ, अचलपूर ,शे. घाट, आंजी मोठी, घुईखेड, साऊर या व इतर अनेक ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयात आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या प्रबोधनमालेतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वृद्धिंगत करुन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्याचा सतत प्रयत्न केला.
‘आदर्श अभ्यासाचे तंत्र’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धिसाठी प्रकाशन :-
प्रा. बुंदेले यांनी आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला, परीक्षेला जाता जाता, मराठी विषयाची आदर्श अध्ययनमाला या शैक्षणिक प्रबोधन मालेतील ज्ञानकण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सन २०११ ला "आदर्श अभ्यासाचे तंत्र" या अभ्यासविषयक पुस्तकाचे लेखन करून ते प्रकाशित केले. या पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी मुख्यसचिव मा.श्री.जे.पी.डांगे साहेब व सुप्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. सुशिला पाटील यांची प्रस्तावना आहे. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भीमराव वाघमारे व डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचे दोन शब्द लाभलेले आहेत. या पुस्तकात सरांनी नऊ प्रकरणातून आदर्श अभ्यासाचे तंत्र, आदर्श निबंध लेखन करणे एक कला, प्रावीण्य मिळविण्याचे अभिनव तंत्र, दहावी- बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती, पेपरला जाताना-पेपर सोडविताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी, विद्याथ्यांनी शिक्षणातील गोडी वृद्धिंगत करण्याचे उपाय, आदर्श भारताचे स्वप्न साकारण्यासाठी तत्त्वनिष्ठ विद्यार्थ्यांची आवश्यकता, स्पर्धा परीक्षा व बारावीनंतरचे शिक्षण या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्यांचे विद्यार्थी जीवन उज्ज्वल करणाऱ्या अनेक गोष्टींचे जीवंत लेखन असे केले आहे की, अभ्यासाबाबत झोपलेला विद्यार्थी सरांचे हे पुस्तक वाचल्यानंतर खडबडून जागृत होतो व अभ्यासाला मनापासून सुरुवात करतो.
मराठी विषयाची आदर्श अध्ययन माला :-
प्रा.बुंदेले यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून "मराठी विषयाची आदर्श अध्ययन माला" या कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यामुळे मराठी विषयाचा निकाल संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मकही वाढलेला होता, त्यांचे बोर्डाच्या परीक्षेत ७५% ते ९५% गुणांच्या दरम्यान ८०% विद्यार्थी दरवर्षी असत.
‘परीक्षेला जाता-जाता’ प्रबोधन मालेची निर्मिती व सादरीकरण :-
"परीक्षेला जाता-जाता" या प्रबोधनमालेचे परीक्षेच्या दोन महिने अगोदर सादरीकरण करुन विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना ज्या समस्या असतात त्या सोडविण्याचा प्रयास त्यांनी स्वशाळेसोबतच इतर शाळेतही केलेला आहे. परीक्षेपूर्वी अमरावती आकाशवाणी, ९०.४ कॉटन सिटी अकोला व इतर आकाशवाणी केंद्रांवर 'परीक्षेला जाता-जाता' या विषयावर मुलाखती सुद्धा झालेल्या आहेत. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली येथे तसेच विदर्भातील अनेक शाळा महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला , परीक्षेला जाता-जाता आणि मराठी विषयाची आदर्श अध्यायन माला या कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण केले होते व आज सेवानिवृत्तीच्या सात वर्षानंतरही सुरूच आहे. पोदार इंटरनल स्कूल अमरावती, एच.व्ही.पी.एम.ची रामकृष्ण क्रीडा आश्रम शाळा, अमरावती, नवोदय विद्यालय, अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला, सर्वोदय विद्यालय व प्रगती विद्यालय, अकोला यासह विदर्भातील शेकडो शाळा महाविद्यालयात या प्रबोधनमालांचे सादरीकरण केलेले आहे.
‘आदर्श अध्यापक प्रबोधन मालेची’निर्मिती व सादरीकरण :-
प्रा. बुंदेले यांनी स्वतः मराठी विषयाचे अध्यापन आठ अध्यापन पद्धतीद्वारे विविध प्रकल्प व उपक्रम राबवून केले होते. त्यांनी हा आदर्श अध्यापनाचा छंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता "आदर्श अध्यापक प्रबोधन माला" या प्रबोधनमालेची निर्मिती करुन तो त्यांनी शेकडो अध्यापकांपर्यंत पोहचविला. त्यांनी या आदर्श अध्यापक प्रबोधन मालेचे सादरीकरण शैक्षणिक गट संमेलन, डी. एड् कॉलेज, बी.एड्. कॉलेज आणि विविध शाळेतील शिक्षकांसमोर सादर करून आदर्श अध्यापनाचे तंत्र शिक्षकांपर्यंत पोहचविले. याचे विवेचन त्यांच्या 'आदर्श अभ्यासाचे तंत्र' या पुस्तकात केलेले आहे. आदर्श अध्यापक प्रबोधन मालेचे आयोजन माझे मित्र प्राचार्य डॉ.श्री.पी.एस. वायाळ सरांनी श्री. शिवाजी अध्यापक विद्यालय, चिखली येथे केले होते तसेच शासकीय अध्यापक विद्यालय, अमरावती व बुलडाणा, श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, अमरावती अशा अनेक अध्यापक विद्यालयात व अनेक शैक्षणिक गट संमेलनात या आदर्श अध्यापक प्रबोधनमालेचे यशस्वी सादरीकरण केले होते व आज सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे हे शैक्षणिक कार्यक्रम सुरुच असतात.
आदर्श पालक प्रबोधन मालेची निर्मिती व सादरीकरण :-
अध्यापक विद्यार्थ्यांना आदर्श अध्यापनातून घडविण्याचा प्रयास करतातच पण त्याला पालकाचीही साथ असणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक जागृतीची आवश्यकता आहे या आवश्यकतेतून त्यांनी "आदर्श पालक प्रबोधन मालेची" निर्मिती केली. शाळेमध्ये पालक शिक्षक संघाद्वारे घेण्यात येणाऱ्या पालक सभेमध्ये "आदर्श पालक प्रबोधन मालेचे सादरीकरण स्वशाळेसोबतच इतर शाळांमध्ये करुन सरांनी पालकांमध्ये पाल्याविषयीची जागृती निर्माण केलेली आहे. पालक जागृती शिवाय विद्यार्थी घडू शकत नाहीत, असे सरांचे स्पष्ट मत आहे; कारण विद्यार्थी हा सहा तास शाळेत आणि अठरा तास घरी असतो म्हणून आई-वडिलांचे मुलांवरील सुसंस्कार आणि अभ्यासाबाबत मुलांची जागृतता या सर्व गोष्टींकडे माता-पित्यांचे लक्ष असणे आवश्यक आहे. जागृत पालकच मुलांना चांगल्याप्रकारे घडवू शकतात असे समाजात अनेक उदाहरण दिसतात. या दृष्टिकोनातूनच सरांचा हा पालक प्रबोधन मालेचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण वाटतो. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे हे सर्व कार्यक्रम शाळा महाविद्यालयातून सुरुच आहेत. प्रा. बुंदेले यांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी जे प्रकल्प व उपक्रम राबविले तसेच विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब करुन प्रभावी अध्यापन केले. असे करुन दरवर्षी विद्यार्थ्यांना गुणवंत बनविण्याचा प्रयास केला.
ते आदर्श अध्यापक प्रबोधन मालेतून नेहमी सांगायचे की ,” वर्गातील समोरच्या आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःचा मुलगा म्हणून शिकवा. जसे आपण स्वतःच्या मुलाला घडवितो तसे घडवा तेव्हाच वर्गातील विद्यार्थी घडेल .”
यावरुन एका आदर्श शिक्षकाच्या अंगी जे गुण असायला हवेत ते गुण मला सरांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसले. यावरुन ते एक “आदर्श शिक्षक” म्हणून नावारुपास आले, असे म्हणता येईल. अशा प्रकारचा आदर्श शिक्षकांनी स्वतःमध्ये निर्माण करून सरांप्रमाणे आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयास केला पाहिजे, असे मला वाटते, कारण त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले प्रकल्प, उपक्रम व विविध अध्यापन पद्धतींचा उपयोग यामुळे ते विद्यार्थीप्रीय झाले होते.
विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव : –
प्रा.अरुण बुंदेले यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आजपर्यंत त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय २४ पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख एज्युकेशनल नॅशनल अवार्ड, डॉ. हरिवंशराय बच्चन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा जोतीराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार, साहित्य माणिक पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख वाड्मय पुरस्कार, संत कबीर कवीराज पुरस्कार, संत गुरु रविदास समाजसेवा गौरव पुरस्कार, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
विविध साहित्य संमेलनातून व साहित्य संमेलनातील कवी संमेलनातून केलेले समाजप्रबोधन :-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमरावती - यवतमाळ,ग्रामीण मराठी दलित साहित्य संमेलन वरुड,विद्रोही साहित्य संमेलन वर्धा,विदर्भ साहित्य संमेलन पुसद,राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन आर्वी - हिवरखेड - मोर्शी,शिक्षक साहित्य संमेलन अमरावती - वाशिम - चिखलदरा,अंकुर साहित्य संमेलन मुर्तीजापूर,अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलन नांदेड, द्विशतकी साहित्य सम्राट साहित्य संमेलन पुणे, स्नेहसंमेलनातील कवी संमेलन,सर्वधर्मसमभाव संमेलन,राज्यस्तरीय तिसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन,शब्द गोड दिवाळी कला कवी संमेलन पुणे, तिसरे अमरावती जिल्हा परिवर्तन विचार विचारवेध साहित्य संमेलन अमरावती,डॉ.पंजाबराव देशमुख साहित्य संमेलन अमरावती ,शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे कवी संमेलन, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमातील कवीसंमेलन या व इतर अनेक साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष, निमंत्रित कवी,परिसंवादातील वक्ता,प्रमुख अतिथी इत्यादी पदावरून दिलेली भाषणं व स्वरचित काव्यगायन व अभंगगायनातून आणि थोरांच्या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमातून फुले - शाहू - आंबेडकरी विचारधारेचे समाजप्रबोधन केले व आजही करीत आहेत.
स्वआचरणातून हुंडाबंदीचा ओनामा त्यांनी केला, हुंडाबंदीसाठी वऱ्हाडी काव्यगीतातून, लेखनातून, 'हुंडा पापाचा हंडा' या एकांकिकेतून व 'भद्याचं लगीनं' या एकपात्री प्रयोगातून जनजागृती केलेलि आहे. मद्यबंदीसाठी 'दारूनं मेला ओ माय' या एकांकिकेतून, वऱ्हाडी कवितेतून, दारूच्या तुंबळी गीतातून, वृत्तपत्रातून आणि 'घडवू या व्यसनमुक्त समाज' या कार्यक्रमातून जनजागृती केलेली आहे व सेवानिवृत्तीनंतरही करीत आहे .
प्रा.अरुण बुंदेले विविध संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्य करतात कारण ते त्या संस्थांचे पदाधिकारी आहेत उदा. कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष,शिक्षक साहित्य संघ अमरावती जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष,श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावतीचे सदस्य, गुरू रविदास सामाजिक- साहित्यिक संशोधन केंद्र अकोलाचे सदस्य,उपेक्षित समाज महासंघ, अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य,वऱ्हाड विकास मासिक, अमरावती चे सहसंपादक आहेत .
इयत्ता अकरावी व बारावीच्या मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून त्यांची नियुक्ती झाली होती.सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आशय समृद्धी प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक सर होते.
जनगणना कार्यामध्ये 'मास्टर ट्रेनर' म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय तंबाखू दिन, स्वच्छ भारत अभियान, लेक वाचवा लेक शिकवा अभियान, जागतिक महिला दिन, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम इत्यादी राष्ट्रीय कार्यामध्ये पथनाट्य, वऱ्हाडी काव्यगायन, भाषण, अभिनय, रॅलीतील प्रत्यक्ष सहभाग व वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, काव्य इत्यादी स्पर्धेतून जनजागृतीचे कार्य त्यांनी केले आहे.पत्राद्वारे व भ्रमणध्वनीद्वारे प्रबोधन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रयास त्यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास शिबीरातून सर्वांगीण प्रगतीचे प्रयत्न. वृक्षारोपणासाठी प्रयत्न व कार्यक्रमातून जनजागृती केलेली आहे.
अशाप्रकारचे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजप्रबोधनकतें, अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ।। विशेष म्हणजे प्रा.बुंदेले स्वतःचा वाढदिवस अंध,अपंगांचे वसतीगृह - शाळा आणि वृद्धाश्रमात भेट वस्तू देऊन कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान तर्फे साजरा करतात.ते ६५ वर्षाचे जरी झाले तरी आजही त्यांचे सर्व क्षेत्रातील कार्य सुरुच आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याला माझ्या सदिच्छा ।। सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य त्यांनी निर्माण केलेल्या विविध प्रबोधनमालेतून ते सतत करीत राहोत, यासाठी सरांना निरोगी आरोग्यासाठी, उदंड आयुष्यासाठी आणि सुखी व आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !

