
नांदगाव, दि. २९ : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक अंतर्गत व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव येथे प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावून विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे उपमुख्याध्यापक मा. डॉ. जोगेश्वर नांदुरकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त गुरुदक्षिणा सभागृहात भावपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव संकुल प्रमुख तथा शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे होते. संस्थेचे सेक्रेटरी . राहुल मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक . ल. ना. ठाकरे, अकॅडमिक बोर्ड सदस्य . भास्कर मधे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष . धनंजय काळे, शालेय समितीचे निमंत्रित सदस्य . मंदार रत्नपारखी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरस्वती पूजन व इयत्ता आठवी ‘अ’च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. मुख्याध्यापक . ल. ना. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून नांदुरकर सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
यावेळी . सुरेश नवसारे व प्रविण अहिरे यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करून नांदुरकर सरांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान अधोरेखित केले. सौ. ऋतुजा नांदुरकर यांनी कौटुंबिक मनोगत व्यक्त करताना त्यांच्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला.

विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक . ल. ना. ठाकरे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नांदुरकर सरांचा सत्कार केला. स्टाफच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक . काकळीज सर यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिक्षक प्रतिनिधी सौ. सुनीता देवरे यांनी सौ. नांदुरकर यांचा साडी व भेटवस्तू देऊन सत्कार केला. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष . धनंजय काळे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, नांदगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनीही नांदुरकर सरांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. जोगेश्वर नांदुरकर यांनी अत्यंत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांनी संस्था, विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे, संस्थेविषयीची कृतज्ञता व्यक्त करत नांदुरकर सरांनी रु. २१ हजारांचा देणगी धनादेश संस्थेचे सेक्रेटरी राहुल मुळे यांच्याकडे, तर विद्यालयाच्या विकासासाठी रु. ५ हजारांचा देणगी धनादेश मुख्याध्यापक . ठाकरे सर व शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे यांच्याकडे सुपूर्द केला. सेवापूर्तीच्या प्रसंगीही संस्थेच्या व विद्यालयाच्या विकासासाठी दिलेली ही देणगी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संस्थेप्रती असलेल्या ऋणानुबंधाचे प्रतीक ठरली.
प्रमुख अतिथी . राहुल मुळे यांनी नांदुरकर सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. अध्यक्षीय मनोगतात. संजीव धामणे यांनी नांदुरकर सरांच्या ‘मुद्रांकित शिक्षण’ या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ध्वनी व्यवस्था . निकम सर, बैठक व्यवस्था ज्ञानेश्वर जाधव, बॅनर व कार्यक्रम पत्रिका . विजय चव्हाण, चहापानाची व्यवस्था श्रीमती ठाकरे, भेटवस्तू व पुष्पगुच्छाची व्यवस्था श्रीमती दीपाली सांगळे व श्रीमती कल्पना जाधव, भेटवस्तू आणण्याची व्यवस्था श्रीमती देवरे व . नवसारे, भोजन व्यवस्था . गुलाब पाटील, प्रसिद्धीकार्य . काकळीज यांनी पाहिले. आकर्षक रांगोळीची जबाबदारी श्रीमती संगीता शिंदे व श्रीमती निकम यांनी पार पाडली. छायाचित्रण विजय चव्हाण, तर व्हिडिओ चित्रीकरण . खांडवी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निवेदिता सांगळे यांनी प्रभावीपणे केले, तर श्रीमती सुनीता देवरे यांनी आभार मानले.
नांदुरकर सरांच्या प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणारा हा सेवापूर्ती सोहळा शिक्षक, विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांच्या भावनांना स्पर्श करणारा अविस्मरणीय व संस्मरणीय सोहळा ठरला.

