पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश; महिला शिक्षकांच्या हस्ते गणपती विसर्जन

नांदगाव (प्रतिनिधी): नमन एज्युकेशन सोसायटी येवला संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव व रेनबो स्कूल नांदगाव येथे गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थाचालक श्री. संजय बागुल सर व उपसंचालिका माननीय सौ. सरिता बागुल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवातील विविध उपक्रमांचे सुंदर नियोजन करण्यात आले.
यावर्षीच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची निर्मिती व स्थापना होय. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनीही शाळेत शिकलेल्या पद्धतीने इको-फ्रेंडली गणपतीची स्थापना करून पर्यावरणपूरक सजावट केली. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट इको-फ्रेंडली गणपतीची स्थापना व पर्यावरणपूरक सजावट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा Certificate of Appreciation देऊन गौरव करण्यात आला.
शाळेतच कृत्रिम विसर्जन कुंडाची संकल्पना
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी शाळेच्या परिसरातच कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्येच शाडू मातीच्या गणपतीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. “बाप्पाचे विसर्जनही पर्यावरणपूरक आणि शाळेच्या परिसरातच” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना जलप्रदूषण टाळण्याचा व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.

महिला शिक्षकांच्या हस्ते गणपती विसर्जन
आजच्या विसर्जन सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपल व उपसंचालिका माननीय सौ. सरिता बागुल मॅडम तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
विसर्जन सोहळ्यात लेझीम पथक, गणपती स्तोत्र व भक्तिमय वातावरण यामुळे उत्साहाला आणखी उधाण आले. गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा, महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. पालकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली, तर विद्यार्थ्यांसाठी विशेष बालभोजनाचे आयोजन करण्यात आले.
सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग
गणेशोत्सव अधिक सुंदर, शिस्तबद्ध व संस्मरणीय करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव अत्यंत नियोजनबद्ध, आनंददायी व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि सामूहिक सहभाग यांचे महत्त्व अनुभवायला मिळाले.
“भक्तीचा उत्सव… पर्यावरण संवर्धनाचा संकल्प… आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला सलाम!”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!

