
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी: ) किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या इतिहासाला उजाळा देत, धर्मपरंपरा आणि राष्ट्रभक्तीचा जागर करत दशनाम गोसावी समाजाच्या माध्यमातून महंत निश्चलपुरी महाराज कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधव व शिवप्रेमींच्या उपस्थितीने रायगडाचा परिसर शिवभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

22 सप्टेंबर रोजी श्री दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे शंभूतीर्थ तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे सकाळी नऊ वाजता अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सायंकाळी नऊ वाजता मंगलमय वातावरणात गडपूजन झाले. धर्मध्वजेचे पूजन, छत्रपती शिवाजी महाराज, महंत निश्चलपुरी , आद्यगुरू शंकराचार्य आदी प्रतिमांचे पूजन तसेच रायगडाच्या पवित्र भूमीला अभिवादन करून द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली.
गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शंखनाद व जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. त्यानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेदरम्यान होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिरकाई मातेची पूजाअर्चा करून माता भगिनींनी ओटी भरण्यात आली. जगदीश्वर मंदिरात भगवान शंकराची शिवमानस पूजा व आरती पठण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन समाधीवर पुष्पांजली अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यानंतर समारोप सोहळ्यात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात आयोजन समितीचे समन्वयक व सिन्नर तालुका सरचिटणीस वसंत गोसावी यांनी बोलताना सांगितले की रायगड म्हणजे स्वराज्याच्या विचारांचे विद्यापीठ आहे.रायगड हा केवळ दगड-मातीचा किल्ला नसून स्वराज्याची राजधानी, प्रशासनाचे केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. १६७४ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड स्वराज्याच्या राजधानीच्या रूपाने इतिहासात अजरामर झाले.
पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारती म्हणाले की, राज्याभिषेकानंतर स्वराज्याला संस्थात्मक स्वरूप देण्याचे काम महाराजांनी केले. प्रजेचे कल्याण, शिस्तबद्ध प्रशासन, न्याय, सुरक्षितता आणि सर्वसामान्य माणसाचा सन्मान या मूल्यांवर आधारित राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यामुळे रायगड आजही महाराष्ट्राच्या सामूहिक अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रेरणास्थान आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गिरी यांनी आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पराक्रमाच्या कथांपुरता न पाहता त्यातील दूरदृष्टी, संघटनकौशल्य, नेतृत्व, नियोजन, शिस्त, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि समाजहिताची भावना आत्मसात करावी, असा संदेश दिला.
संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी केली. डोंगर-दऱ्या, किल्ले, मावळे आणि सामान्य जनतेच्या सहकार्याच्या बळावर त्यांनी मोठी ऐतिहासिक घडामोड घडवून आणली. त्यामुळे तरुणांनी इतिहासाचा अभिमान बाळगताना त्यातून वर्तमान घडविण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
“रायगड पाहताना केवळ इतिहास पाहू नका; रायगडाने दिलेला स्वराज्याचा विचार आपल्या जीवनात उतरवा,” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महाराष्ट्रभर द्वितीय शिवराज्याभिषेकाचा जागर करण्याचा संकल्प यावेळी शिवप्रेमींनी केली.यावेळी उपस्थित समाजबांधवांनी महंत निश्चलपुरी महाराज कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास, परंपरा आणि स्वराज्याचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प केला.
या सोहळ्यासाठी सिन्नर येथून भैरवनाथ गोसावी, वसंत गोसावी, छगन गोसावी, रवींद्र गिरी, शरद गोसावी, गुलाब गोसावी, ब्रह्मगिरी गोसावी, अशोक गोसावी, सुभाष गोसावी, बाळासाहेब गोसावी, लालाभाऊ मुत्रक, विशाल जाधव, निफाड येथून संदीप गोसावी, संगमनेर येथून माधव विठ्ठल पुरी, उल्हास गोसावी, राजाराम गोसावी, जालिंदर गिरी, दिनेश गोसावी तसेच सातारा येथून जगन्नाथ गोसावी आदी उपस्थित होते.
याशिवाय पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव, ठाणे, कल्याण आदी जिल्ह्यांतून दशनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनात नवनाथ भारती, मुकुंद गोसावी, नंदकुमार गोसावी, अनिल भारती आणि माऊली गोसावी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवप्रेमी आणि समाजबांधवांच्या भोजनाची व्यवस्था रायगडाच्या पायथ्याशी दशनाम गोसावी समाजाच्या वतीने करण्यात आली.रायगडावर घुमलेला शिवराज्याभिषेकाचा जयघोष आणि स्वराज्याचा विचार महाराष्ट्राच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यामुळे यंदाचा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

