
डॉ. श्रीदेवी योगेश चांदक यांचे ‘निरोगी जीवनशैली’वर मार्गदर्शन
लासलगाव, दि. १७ ऑक्टोबर ( प्रतिनिधी ): येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि विद्यार्थी विकास मंडळ (SDO) विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत विशेष आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बदलत्या जीवनशैलीत तरुणांचे आरोग्य आणि निरोगी राहण्याच्या सवई यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून लासलगाव येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. श्रीदेवी योगेश चांदक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘निरोगी जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांना आरोग्याची गुरुकिल्ली समजावून सांगितली. आपल्या संवादात त्यांनी प्रामुख्याने दातांची योग्य निगा कशी राखावी, आहार आणि खानपानाच्या चुकीच्या सवई टाळून संतुलित आहाराचे महत्त्व, बदलती जीवनशैली आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम तसेच तरुणांचे आरोग्य यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या धकाधकीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तरुण पिढीने आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि निरोगी सवई अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे यांनी विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम आणि दैनंदिन व्यायामाचे महत्त्व पटवून देत, या उपायांद्वारे उत्तम आरोग्य कसे राखता येऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील गायकर यांनी केले, तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. मिलिंद साळुंके यांनी केले. आणि आभार डॉ. संजय शिंदे यांनी मानले.
या आरोग्यसंवाद कार्यक्रमास महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. देवेंद्र भांडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. या. कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

