
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन; ‘पुस्तक भेट’ उपक्रम राबविण्याचा संकल्प
सिन्नर : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ओम साई सामाजिक सेवाभावी संस्था संचलित शारदा महाविद्यालय, सिन्नर येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागप्रमुख प्रा. पवन वर्मा यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले.
महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथपाल प्रा. निलोफर शेख यांच्याकडून विविध पुस्तकांची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. पवन वर्मा यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रतिकूल परिस्थिती ही यशाच्या मार्गातील अडथळा न मानता, तिच्यावर मात करण्याची संधी समजावी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रा. रेणुका साळी यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे परीक्षण सादर केले. या पुस्तकातून डॉ. कलाम यांचा संघर्षमय जीवनप्रवास, त्यांची जिद्द, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशाप्रती असलेली निष्ठा आणि यशासाठी केलेले अथक प्रयत्न यांचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. निलोफर शेख यांनी ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. वाचन प्रेरणा दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वाचनाची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, भाषिक कौशल्ये आणि साहित्यिक जाणीव समृद्ध होण्यास मदत होते. तसेच ज्ञानसंपन्न व जागरूक समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीचा विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने वर्षभर ‘पुस्तक भेट’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे आणि वाचन संस्कृती रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला प्रा. पवन वर्मा, प्रा. राजेंद्र पवार, प्रा. गुरुदत्त सोनावणे, प्रा. अंजुम सय्यद, प्रा. निलोफर शेख, प्रा. रेणुका साळी, प्रा. दक्षा जाधव, प्रा. तेजस्वी काकड, प्रा. संजीवनी थोरात, कु. कल्याणी बोडके, प्रा. अंजली कानडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी थोरात यांनी केले, तर आभार प्रा. तेजस्वी काकड यांनी मानले. ग्रंथालय विभागाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा आणि समाजात वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.

