
नाशिक ( प्रतिनिधी)“जिथे कमी, तिथे आम्ही!” या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिकच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या पूर्वसंध्येला सावली वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी “आनंदाची सावली – आरोग्याचे संवर्धन व नात्यांचा स्नेहसोहळा”

या सेवाउपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आय ड्रॉप्स, बिस्किटे, राजगिरा लाडू, चिक्की व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच गरबा-दांडिया, जुन्या गाण्यांची मैफल, हास्ययोग आणि गप्पागोष्टी अशा विविध मनोरंजक उपक्रमांतून ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता आले.

सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या स्नेहसोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना आपुलकी, सन्मान आणि आपलेपणाची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.याप्रसंगी सतीश कुलकर्णी, किशोर पाटील, अशोक सावकार, प्रभा लाल, अनिल नहार आणि सपना कोठावदे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.“ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या मनातील समाधान हीच आमच्या सेवाकार्याची खरी पावती आहे,” या भावनेतून फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्याचा आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक“ज्येष्ठांचा आशीर्वाद… आमच्या सेवाकार्याची खरी ऊर्जा!”

