
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान; आरोग्यविषयक मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व
नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात निष्ठेने, समर्पित भावनेने आणि दूरदृष्टीने कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श मुख्याध्यापक गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जि.प. उपशिक्षणाधिकारी गणेश आकुसकर, सह्याद्री हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल कैचे आणि डॉ. चेतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप सांगळे, कार्याध्यक्ष एस. के. सावंत आणि सचिव दीपक गायकवाड यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
गुणवंतांचा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या कार्याचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापकांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. या सोहळ्याचा मुख्य हेतू गुणवंतांच्या कार्याची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचविणे हा होता.
आरोग्यविषयक मार्गदर्शनातून निरोगी जीवनाचा संदेश
डॉ. राहुल कैचे यांनी हृदयाचे आरोग्य जपण्याचे महत्त्व व निरोगी जीवनशैली यावर मार्गदर्शन केले. डॉ. चेतन पाटील यांनी मेंदू व रक्तवाहिन्यांची कार्यपद्धती स्पष्ट करत आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
शिक्षणातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन
आमदार किशोरभाऊ दराडे यांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत मुख्याध्यापकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्याध्यापक संघाच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन
या समारंभाला मार्गदर्शक बी. के. नागरे, भगीरथ घोटेकर, शहराध्यक्ष सुरेश घरटे, उपाध्यक्ष लक्ष्मण बेनके, रघुनाथ गायकवाड, अनिल माळी, विनायक पाटील, अर्जुन घोडेराव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सह्याद्री हॉस्पिटलचे आशिष गायकवाड आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले तर आभार अध्यक्ष प्रदीप सांगळे यांनी मानले.

