
नाशिकरोड (प्रतिनिधी): कवी तथा सुप्रसिद्ध सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या गाजलेल्या काव्यसंग्रहावरील साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या निवडक ४५ आस्वादात्मक प्रतिक्रिया एकत्रित करणारे ‘अक्षरमोती पेरताना…’ हे पुस्तक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. वैशाली प्रकाशन, पुणे प्रकाशित आणि ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले संपादित या पुस्तकावर ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व गौरवपूर्ण अभिप्राय नोंदविला आहे.

ढिकले यांनी ‘अक्षरमोती पेरताना…’ या पुस्तकाला “भावभावनांचा समृद्ध शब्दझुला” अशी उपमा देत रवींद्र मालुंजकर यांच्या कवितेतील सहृदयता, माणुसकी, प्रेम, वात्सल्य, सकारात्मकता आणि जीवनमूल्यांचा विशेष गौरव केला आहे. त्यांच्या मते, मालुंजकर यांची कविता सहज, सोपी, प्रासादिक आणि थेट वाचकांच्या काळजाला स्पर्श करणारी असून ती आजच्या काळात आश्वस्त करणारी ठरते.
या पुस्तकात ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहावर साहित्यविश्वातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या निवडक ४५ आस्वादात्मक प्रतिक्रिया समाविष्ट करण्यात आल्या आहेत. संपादक विवेक उगलमुगले यांनी या संकलनाला “जमून आलेलं भावकोलाज” असे संबोधत ते भावभावनांचे दस्तऐवजीकरण असल्याचे म्हटले आहे.
ढिकले यांनी आपल्या अभिप्रायात प्रा. संदीप वाकचौरे, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रा. सुनील हिंगणे, डॉ. सुरेश सावंत, प्रशांत केंदळे, रामदास खरे, सरोजिनी देवरे, प्राचार्य प्र. द. कुलकर्णी आदी मान्यवरांच्या प्रतिक्रिया उद्धृत करत काव्यसंग्रहाच्या साहित्यिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला आहे. या सर्व प्रतिक्रिया ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहाचे वेगळेपण आणि दर्जा अधोरेखित करणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुस्तकाच्या माध्यमातून उत्तम कविता वाचण्याची प्रेरणा मिळेल, तसेच साहित्यप्रेमी, कवी, शिक्षक आणि अभ्यासकांसाठी हा ग्रंथ संग्राह्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यानिमित्ताने रवींद्र मालुंजकर आणि संपादक विवेक उगलमुगले यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वैशाली प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘अक्षरमोती पेरताना…’ या पुस्तकाची मूळ किंमत ₹३०० असून विशेष सवलतीत ₹२५० (पोस्टेजसह) मध्ये उपलब्ध आहे.

