
मदन हिरे : मैत्रीतील अस्सल हिरा !
लेखक:-भास्कर कदम नांदगावकर.
हिरे आणि कोळसे, अशी नेहमीच समीक्षा केली जाते. मी माझ्या कळत्या वयापासून मैत्रीतील अनेक ‘हिरे’ आणि ‘कोळसे’ही पाहिले, अनुभवले आहेत. कोळसा कितीही उगळला तरी तो काळाच असतो; जाळला तर राखच होते. आज कोळशाऐवजी हिरे याचीच चर्चा करू या. त्याचे कारण असे की, माझा अर्ध्या शतकाहून अधिक काळाचा जीवलग अस्सल मित्र मदन हिरे याचा आज वाढदिवस; त्यानिमित्त त्याचे प्रथमतः हार्दिक अभीष्टचिंतन !
आम्ही दोघांनीही आयुष्यातील चढउतार म्हणजेच उन्हाळे -पावसाळे पाहिले आहेत. त्यातील अनेक वर्षे दुष्काळी गेली, तर अर्धी झोपेत गेली. उरला हिशेब तो जगलेल्या, जाणलेल्या, जाणीव असलेल्या आयुष्याचा. त्यात वजाबाकीची सोडून बेरजेचाच हिशोब मांडतांना अनेक आठवणी आजही मन:चक्षू समोर आहेत.
मदन आणि मी एकाच महाविद्यालयात पण वेगवेगळ्या वर्गात होतो. महाविद्यालयीन निवडणुका हा आमच्या अभ्यासापेक्षा आवडीचा विषय. आमची टोळी त्यासाठी सदैव तत्पर असायची. मदन हा कॉलेजचा क्रीडा क्षेत्रातील जनरल चॅम्पियन. त्याला आमच्या टोळीने जिमखाना सेक्रेटरी म्हणून निवडून आणले. त्याचबरोबर आमचा दुसरा मित्र युवराज पाटील याला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आणले. यामुळे कॉलेजमधील आमच्या विरोधी गटाने गॅदरिंगवर बहिष्कार घातला. तीच आमच्यासाठी स्टेजवरील पहिली संधी ठरली. आम्ही नाटक, एकांकिका, विविध गुणदर्शनाने आम्ही अक्षरशः गॅदरिंग गाजविली म्हणण्यापेक्षा आमचे सुप्तगुण चौफेर उधळले.
मदन बासरी सुंदर वाजवायचा. त्याचा आवाजही गोड असल्याने त्याने वाजवलेल्या बासरीच्या धुनीसह म्हटलेले ‘काठी न घोंगडं घेऊ द्या की रं’ हे गाणं तुफान हीट झाले. त्याला कारणही तसेच होते. त्यात चंदनपुरी जत्रेच्या उल्लेखासह आम्हा मित्रांची नावे मदनने त्यात गुंफली होती. तरुण तुर्क म्हातारे अर्क या तीन अंकी नाटकातील त्याची प्रोफेसर बारटक्केची भूमिका विशेष गाजली.
मदन हा तसा हरहुन्नरी. मनाचा मोकळा तितकाच स्वभावाचा फटकळ. त्याच्या सेवापूर्तीचा सोहळा शनिमंदिर नस्तनपूर येथे होता. त्यातील त्याने मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, लोक चारधाम करतात; माझे पाचवे धामही झाले आहे. निमगावच्या तत्कालीन राजकीय वादात मदनला सेंट्रल जेलला जावे लागले होते. त्याचे त्याने पाचवे धाम म्हणून उल्लेख केला होता.
मदन आणि मी जसा कॉलेजला एकत्र होतो, तसेच नांदगाव नगरपालिकेत तो ऑफिस सुप्रिडेंट म्हणून काम करीत असतांना मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तेव्हा पुन्हा एकत्र झालो. नाशिकच्या मिटिंगसाठी तो माझ्या सोबत असायचा. त्याचा पेहराव व हुलीया असा होता की, तो नगराध्यक्ष भासायचा आणि त्याचा कारकून.
मदन आता सेवानिवृत्त झाला आहे. दहा वर्षांपूर्वी मदनच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात नांदगावचे विद्यमान आमदार सुहासअण्णा कांदे आपल्या भाषणात म्हणाले, मदन हिरे यांनी राजकारणात येवून जनसेवा करावी. शिवसेनेत त्यांचे स्वागत केले जाईल, असे शिवसेनेचा ग्रामीण जिल्हा प्रमुख या नात्याने आवाहन करतो, असे नमूद करून त्यांच्या सेवेचा गौरव केला होता.
मदन हिरे हा राजकारणात नाही पडला. परंतु, मदनाचा मुलगा सागर मदनराव हिरे याला आमदार सुहासअण्णा कांदे यांनी नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष केला. अशाप्रकारे नगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा नगराध्यक्ष झाला, हा नगरपालिकेत एक इतिहास ठरला. मदन हिरे याने जे स्वप्नात पाहिले नव्हते, असे स्वप्न प्रत्यक्षात आले, आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या पुण्याईने मदनचा मुलगा सागर नगराध्यक्ष झाला. माझा अस्सल मित्र नगराध्यक्षाचा बाप झाला.
आज त्याने वयाची ६८ वर्षे ओलांडली आहेत. मदन आता शेतीत रमलाय मी साहित्यात. नांदगाव भेट मात्र ठरलेली आणि ठिकाणही ठरलेलं. मैत्रीतील अस्सल हिरा असलेल्या मदनला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, अशी निर्मीकाकडे प्रार्थना !
भास्कर कदम नांदगावकर.

