
नाशिकरोड:- (.प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक २०चे नगरसेवक कैलास मुदलियार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिखरेवाडीतील कुसुमाग्रज विरंगुळा केंद्रात सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांच्या ‘चला कवितांच्या गावात…’ ही काव्यमैफिल रंगली.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या व्याख्यानात कवी रवींद्र मालुंजकर यांनी सुरेल आवाजात लोकप्रिय गीते, विडंबन कविता, वात्रटिका, हास्यकविता, गझल, पोवाडा, लोकगीते अशा आशयसंपन्न रचनांसह विविध कवितांचे सादरीकरण केले. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना निखळ हास्यरसाची मेजवानी देत हास्य-काव्यधारांमध्ये चिंब-चिंब भिजवले. मनसोक्त गप्पा मारत काही गंभीर कविता सादर करून हसता-हसता अंतर्मुख केले. या मैफिलीला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
संकल्पक नगरसेवक कैलास मुदलियार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कलंत्री, चांगदेव बोराडे, गणपत भोज, जगदाळे, अंबादास बोराडे, दत्ता कुलकर्णी, सुरेश जयस्वाल, पुंजाजी मगर, विजय देसाई, सुरेंद्र चव्हाण, प्रकाश भालेराव, अशोक चौधरी, भावसार, राजेश वाघ, छगन वाघ, ज्ञानेश्वर गायकवाड आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विनायक उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय कुलकर्णी यांनी ‘हिची चाल तुरू तुरू…’ हे गाणे सादर केले. नितीन गायकवाड यांनी आभार मानले. सुनील काळे यांनी सूत्रसंचालन केले.

