
थेऊर (प्रतिनिधी) – मु. पो. थेऊरखुला येथील अजय विजय वाघमारे यांनी अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन आयोजित राज्यस्तरीय कला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. गट नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत त्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवली. त्यांच्या या यशानंतर व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
अजय वाघमारे यांना नृत्य क्षेत्रात नटराज डान्स अकादमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले, तर एकपात्री अभिनयासाठी संध्यादीप, पुणेचे संदीप पंडित सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनचे सचिव डॉ. प्रमोद ननावरे यांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षांपासून या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कलाकार सहभागी होतात. नृत्य, नाटक, संगीत, गायन आदी विविध कलांचा संगम या व्यासपीठावर अनुभवायला मिळतो.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोथरूड (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी इंडियाज बेस्ट डान्सर पर्व–३चे विजेते समर्पण लांबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अजय वाघमारे यांच्या यशाबद्दल संध्यादीप संस्थेचे सर्व स्पर्धक, मार्गदर्शक तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

