
नाशिक: दि.१९ वार्ताहर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी.के. यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी व श्री सावंत बी एस व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढेपले बी के हे होते.शिक्षक मनोगत व्यक्त करतांना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस यांनी कर्मवीर गणपतदादांचे मूळ गाव पिंपळगाव बसवंत. दादांचा जन्म १८७४ मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पिंपळगाव म्हणजे ऐतिहासिक वारसा व दळणवळणाचे प्रमुख केंद्र असल्याने अनेक चळवळी येथे झाल्या असल्या, तरी गणपतदादांच्या कार्यामुळे पिंपळगावची खरी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षणरूपी यज्ञात आपल्या आयुष्याची समिधा टाकली. परिस्थितीला न डगमगता स्वाभिमानी व बंडखोर प्रवृत्तीने अंधश्रद्धेच्या अंधकारात चाचपडणाऱ्या समाजाला नवीन दिशा दिली. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अस्मितेची जाणीव करून दिली. चार भिंतीतील शाळेपेक्षा या परिस्थितीच्या अनुभवानेच गणपतदादांना खूप काही शिकवले. देवभोळेपणा, अंधश्रद्धा यामुळे समाजाची अधोगती होते, हे त्यांनी पाहिले. समाजातील दुःखाचे कारण मुळापासून काढून कसे टाकता येईल, याचा ते सतत विचार करत असायचे. त्यांच्या विचारांना ऐन तारुण्यात सत्यशोधक समाजाच्या विचारांची साथ मिळाली. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री ढेपले बी के सर यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांचे जीवनकार्य राजर्षी शाहू महाराज यांची भेट तसेच संस्थेसाठी केलेले योगदानाचे महत्त्व सांगितले.सूत्रसंचालन श्री सावंत बी एस सर यांनी केले. आभार श्री भामरे पी एस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते .

