
नाशिकरोड: (प्रतिनिधी ) – येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या २८ महिला आणि १२ पुरुष सभासदांची मांगीतुंगी आणि प्रकाशा (दक्षिण काशी) वर्षाऋतू सहल उत्साहात संपन्न झाली.
प्रारंभी मांगी-तुंगी येथील भगवान ऋषभदेव, ऋषभगिरी येथे जाण्यासाठी निघाले. विविध स्तोत्रे आणि भजने गात भक्तीमय-प्रसन्न वातावरणात, सभोवताली होणाऱ्या पावसामुळे बहरलेल्या हिरव्यागार निसर्गाला डोळ्यात साठवत, वृषभगिरी पायथ्याशी सकाळी पोचले. तेथील व्यवस्थापक चीफ इंजिनिअर सी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाच्या गाडीने समुद्र सपाटीपासून ४३६६ फूट उंचीवर असलेल्या भगवान ऋषभदेवांच्या येथे १०८ फूट उंचीच्या अखंड पाषाणातील मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण निघाले. संपूर्ण जगातील,l अखंड पाषाणातील ही एकमेव मूर्ती आहे. संध्याकाळी प्रकाशा (दक्षिण काशी) येथील तापी, गौतमी आणि पुनिंदा नद्यांच्या संगमावर १०८ महिलांनी पारंपारिक वेशभूषेत महाआरती केली. परिसरातील हजारो लोक दर्शनासाठी उपस्थित होते.
प्रकाशा येथील बालाजी लाॅन्समध्ये रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला सभासद सुनंदा गोसावी, अर्चना सहस्त्रबुद्धे, दीपाली भिंगारकर, मनीषा जोशी, अनुराधा गोडसे, वैजयंती डांगे, मंगल मोहरील, ज्योती वाघमारे यांनी भजने सादर केली. डॉ.सुभाष पाटील यांनी गप्पाष्टकेद्वारे उपस्थितांशी हितगुज केले. अरुणा बर्गे, पद्मा देशपांडे, स्मीता ओक, मृणाल प्रभुणे, सुनंदा गोसावी, उज्ज्वल वैद्य, ज्योती वाघमारे, अंजली बेणारे, परमेश्वर चिंतकिंदी, जगदीश बडगुजर आणि अविनाश गोसावी यांनी भक्तिगीते सादर केली. सुधा डमरे आणि मृणाल प्रभुणे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कल्पना वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानानंतर कार्यक्रमांची सांगता झाली. मंगळवारी सकाळी प्रकाशा (दक्षिण काशी) येथील पुरातन मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण मार्गस्थ झाले. केदारेश्वर, काशी विश्वेश्वर महादेव, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर महादेव, संगमेश्वर महादेव, कपिलेश्वर महादेव, कालभैरव, कानबाईमाता, अन्नपूर्णा या मंदिरात दर्शन घेऊन जेवणानंतर सगळे नाशिकला परतण्यासाठी निघाले.
सचिव अविनाश गोसावी यांनी नियोजन व व्यवस्थापन केले. सहल यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा सुनंदा गोसावी, सचिव अविनाश गोसावी, खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, उपसचिव श्रीकांत मोहरील, मोहन बोकील, मनीषा जोशी, सुप्रिया बनसोड, कार्यकारिणी सदस्य आणि गटप्रमुखांनी विशेष परिश्रम घेतले.

