
नांदगाव (प्रतिनिधी): स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर, नांदगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व पालखी पूजन शाळेच्या मुख्या. मा.सौं. सुनिता जाधव मॅडम तसेच शाळेचे अधीक्षक मा. श्री. भैयासाहेब चव्हाण सर यांनी केले
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या वेशभूषेत आकर्षक दिंडी काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी” या नामघोषाने संपूर्ण शाळा भक्तिरसात न्हाऊन निघाली. विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड, भक्तिगीते तसेच संतांच्या जीवनावरील मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुख्याध्यापकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संत परंपरेने दिलेले सत्य, सेवा, समता, सदाचार आणि मानवतेचे विचार आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन श्री. मुळे सर, बुरकूल सर यांनी केले.तसेच शाळेतील शिक्षिका आशा सोनवणे (शेवरे ) मॅडम यांनी गाण्यातून संतांची ओळख करून दिली. पाटील सर यांनी कांदा पौर्णिमा बद्दल छान माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.माऊली मंदिरातील ह. भ. चव्हाण महाराजांनी मुलांना आषाढी एकादशीचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि नैतिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

