
नाशिक (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात अनेक कठीण प्रसंगातुन मार्ग काढावा लागतो. सुंदर जगण्यासाठी ़ संघर्ष करावा लागतो कारण संघर्ष हाच जगण्याचा आत्मा आहे असे प्रतिपादन सुनील पगार यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमा मध्ये २८८ वे पुष्प गुंफतांना सुनील पगार हे गदलं या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते.

सुनील पगार पुढे म्हणाले की, गदलं म्हणजे जुन्या पुराण्या फाटलेल्या कपड्यांचे अंथरूण म्हणजे गदलं. जुन्या कापडांची जाड जोड करून ठिगळ देऊन मायेची उब निर्माण करणारे गदलं ही मायेची उब आहे. ग्रामीण भागाचे चित्रण या पुस्तकात असून, कोजागिरीची रात, आखाडा, दुबळवाडी, सावलीचा अर्थ काय, आंबा, कल्लोळ नामपुर चा, सिनेमा,जोधा भादवा, आमराई,साळू याळ तहान,वाघी कुत्री, अशा विविध आठवणींचा मागोवा या पुस्तकात मांडला आहे. ग्रामीण भागातील आठवणी कधीच न संपणारे असतात.काळ बदलत असला, तरी गावातील गल्लीबोळात घालवलेले बालपण आजही तसेच उभे राहते. परमेश्वरांने निर्माण केलेले गाव सुंदरच असते. ते जाणून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. गावगाड्यातील माणसं, मित्रपरिवार, नातेवाईक यामुळे प्रेमाने सहवासाने फुललेली माणसं वाचण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.गावाच्या पलीकडे जाऊन गावातील वर्णन गावातील अनेक घटनांचा मागोवा नवीन पिढीला कळवा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. संघर्ष हा जगण्याचा आत्मा आहे. तो संघर्ष काळाबरोबरच माणसाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. जीवनातील अनेक सुख दुख पचवुन शहरात राहुनही गावाशी नाळ जोडून ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
यावेळी साहेबराव उगले, सुहास टिपरे, या भाग्यवान श्रोत्याना ग्रथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुनंदा पाटील यांनी आभार मानले. तर सुत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले.
दरम्यान येत्या २७ जुलै रोजी पंढरी पगारे हे सुधारक या पुस्तकावर ऐस पैस गप्पा करणार आहेत.

