
नाशिक दि.२६ (बातमीदार) गझलेचा एक शेर का एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळे कवीने कविता असो कि गझल कमीत कमी शब्दांत ती मांडावी. कारण जी महासागराला जाऊन भिडते तिला सरिता म्हणतात. अन जी ह्रदयसागराला जाऊन भिडते तिला कविता म्हणतात. अशी ह्रदयाला भिडणारी कविता करता आली पाहिजे. ती यावी याच उदात्त हेतूने नाशिक कवी ही संस्था गेली चोवीस वर्षे सातत्याने कार्य करीत आहे हे निश्चितच गौरवास्पद आहे असे प्रतिपादन प्राचार्य देवदत्त बोरसे यांनी केले. ते नाशिक कवी आयोजित दर महिन्याला होणाऱ्या काव्य मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बाहेर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतांना कालिदास कलामंदिराच्या प्रांगणामध्ये भक्तिरसात चिंब भिजलेल्या कवितांचे सादरीकरण एका वेगळ्या विश्वात घेऊन गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस होते. देवदत्त बोरसे यांनी आपल्या खास शैलीतल्या गझलने कार्यक्रमाची रंगत वाढवलीच परंतु अंतर्मुख करायला लावणाऱ्या गझलने उपस्थित भारावून गेले ते म्हणतात
घास भुकेल्या मुखात देतो मुक्त मनाने
पुण्याची ही वाट वाटते बरी विठ्ठला ||
आईबाबा चरणी माझी तीर्थ पंढरी
जमले तर ये कधीतरी तू घरी विठ्ठला ||
अशाच आशयघन कवितांनी ही संध्याकाळ काव्यरसात न्हाऊन निघाली. यावेळी संजय आहेर, रतन हिरे आणि पोतदार यांच्या तीन उत्कृष्ट कवितांना सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यामध्ये सुहास टिपरे, चैताली कापसे, माणिकराव गोडसे, अशोक कुमावत, सुधाकर भामरे, कविता कासार, सोनाली चव्हाण, सोमदत्त मुंजवाडकर, योगेश जाधव यांच्यासह अनेक कवी उपस्थित होते. नाशिक कवीचे उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी यांनी प्रास्ताविक केले तर किरण मेतकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भारती देव यांनी केले.

