
नांदगाव ( )येथील म.वि.प्र.समाजाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ आणि ‘जय भवानी माता ट्रस्ट’, माणिकपुंज यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकपुंज येथे दि.24 जुलै रोजी भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमांतर्गत गावातील ‘भवानी माता’ मंदिराच्या डोंगर परिसरात विविध ठिकाणी १००० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यू.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबाजी अहिरे, प्रा.योगेश वाघ, राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के. पवार, महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.एम.बी. आटोळे, प्रा.एस.सी. पैठणकर तसेच सरपंच श्री.विष्णू मेंगाळ, उपसरपंच श्री.समाधान वाघ, वनरक्षक ए.आर.पवार, ग्रामसेवक एस.एस.शिंदे, तलाठी अविनाश नलावडे तसेच जयभवानी माता ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय कोल्हे, उपाध्यक्ष गणेश मोहिते आणि कार्याध्यक्ष हिरामण मेंगाळ उपस्थित होते.

कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, ग्रामपंचायत तसेच ट्रस्ट पदाधिकारी आणि माणिकपुंज येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षारोपण केले. प्रत्येक रोपाला संरक्षक जाळी लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडे सोपवण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.एन.यू.पाटील म्हणाले की, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आज लावलेली १००० झाडे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा आणि पाणी देतील.” प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून ‘जय भवानी माता ट्रस्ट’च्या ह्या उपक्रमाचा गुणगौरव आपल्या मनोगतातून केला. माणिकपुंजचे उपसरपंच समाधान वाघ यांनी ‘जय भवानी माता ट्रस्ट’च्या कार्याची व यापूर्वी राबविलेल्या उपक्रमांची माहिती याप्रसंगी दिली.
सदर उपक्रम म.वि.प्र. महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभाग आणि ‘जय भवानी माता ट्रस्ट’ यांनी समन्वयाने राबवला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा वृक्षारोपण सोहळा यशस्वी झाला असून, लावण्यात आलेल्या सर्व रोपांच्या निगराणीसाठी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

