नाशिकरोड (प्रतिनिधी):- विविध आशयाच्या एकापेक्षा एक सरस कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केल्याने ज्येष्ठ कवयित्री अलका अमृतकर आणि आसावरी रोकडे यांची स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेत आशयसंपन्न 'काव्यसंध्या' उत्तरोत्तर रंगत गेली.
येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात ज्येष्ठ कवयित्री अलका अमृतकर आणि आसावरी रोकडे यांच्या स्वरचित काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. सुनंदा गोसावी अध्यक्षस्थानी होत्या.
कवयित्री अलका अमृतकर यांनी शब्द माध्यम असता, बाप, दर्पणात न्याहाळताना, मायबाप ही दौलत, पांडुरंगा, काळजातली आई, पापणीचा काठ ओला, सुखदुःख दोन्ही हाती, गजबजलेल्या शहरात आणि माझं कपाट या कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर कवयित्री आसावरी रोकडे यांनी भावमधुर स्वरात भाववाढ, विचारपूस, डोंगर का पाणी, दरोडा, वेडे कवी, सातबारा, मी, खाऊगल्ली, टप्पल आणि विठ्ठल या कविता सादर करत सर्वांची दाद मिळवली. सभासदांच्या वतीने वैजयंती डांगे यांनी वारी तुमची-आमची, रेखा नाशिककर यांनी दिंडी या स्वरचित काव्यांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सादरीकरण केलेल्या कवितांचे कौतुक करत स्वरचित 'सायकल' या कवितेचे सादरीकरण करत वाहवा मिळवली. दत्तात्रय पाटील यांनी परिचय करून दिला. वैजयंती डांगे यांनी सूत्रसंचालन करत त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हटली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, उपसचिव श्रीकांत मोहरील, मोहन बोकील, वसंत उपासनी, कल्पना वैद्य, चांगदेव बोराडे, रमाकांत होनराव, ॲड.गोविंद पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीकांत मोहरील यांनी सभासद वाढदिवस शुभेच्छा आणि सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कल्पना वैद्य यांनी आभार मानले.