
संगीतपंढरी’ मिरजेचे पर्यटन
संगीत विषयक स्थळांची सहल
‘संगीतपंढरी’ मिरजमध्ये देशातील पहिले ‘म्युझिकल टुरिझम’ सुरू होत आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांच्या संकल्पनेतून ही अभिनव पर्यटन यात्रा साकारली आहे. यामध्ये शहरातील संगीतविषयक विविध स्थळे, संगीतक्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या वास्तू, समाधीस्थाने, स्मृतिमंदिरे, तंतुवाद्यनिर्मितीचा प्रवास, संगीतविषयक ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.
गेली पाच वर्षे मंडळाच्या वतीने अशा संगीतविषयक सहली आयोजित केल्या जातात. त्याला आता सुनियोजीत आणि भव्य स्वरूप येत आहे. शहरातील संगीतपरंपरेचा समृध्द आणि वैभवशाली इतिहास या पर्यटन यात्रेतून उलगडणार आहे.
देशात आणि जगभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनविषयक नाना प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनांबरोबर गेल्या काही वर्षांत निसर्ग पर्यटन, कृषि पर्यटन, समुद्र पर्यटन असे विविध प्रकारचे पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मोठय़ा प्रमाणात आहेत, तेथे अलीकडे ‘मेडिकल टुरिझम’ नावाचा पर्यटन प्रकार उदयास आला आहे.
या सर्व पर्यटन प्रकारापेक्षा एक वेगळा आणि अभिनव प्रयोग मिरजेत राबविला जात आहे. तो म्हणजे ‘म्युझिकल टुरिझम’. देशातील हा अशा पध्दतीचा संगीतविषयक पर्यटनाचा पहिला आणि एकमेव प्रयत्न आहे. गेली पाच-सहा वर्षे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर हे महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहासप्रेमी नागरिक यांना शहराच्या संगीतपरंपरेची ओळख करून देतात.
समृध्द संगीत परंपरा लाभलेल्या मिरज शहरातील संगीतविषयक वास्तू आणि गायक-वादकांची स्मृतिस्थळे दाखवत असतात. पुणे, सांगली, सातारा आणि मिरज येथील नागरिकांना ही संगीतमय पर्यटन सफर कुमठेकर यांनी घडवून आणली आहे. याच सफरीचा पुढील टपप्पा म्हणून शहरात ‘म्युझिकल टुरीझम’ विकसीत करण्याची कल्पना मानसिंगराव कुमठेकर यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली देखील आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.
मिरज शहराला अडीचशे वर्षांहून अधिक काळाची वैभवशाली संगीत परंपरा आहे. ग्वाल्हेर घराण्याची गायकी महाराष्ट्रात आणणारे महादेवबुवा गोखले इथलेच. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी मिरज दरबार गायक म्हणून अनेक वर्षे रसिकांचे रंजन केले. याच मिरजेत बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबरांनी गानविद्या संपादन केली. विष्णू दिगंबरांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन, प्रो. बी. आर. देवधर हे इथलेचं. याच बी. आर. देवधर यांनी कुमार गंधर्वांना गायनाचे धडे दिले. बाळकृष्णबुवांचे शिष्य असणाऱया मिरजेतील निळकंठबुवा जंगमांकडे ख्यातनाम गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर शिकले.
मिरज ही जशी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकांची कर्मभूमी तशीच ती किराना घराण्याच्या गायकांच्या सूरांनी न्हाऊन निघालेली नगरी. संगीतरत्न अब्दूलकरीम खाँच्या 40 वर्षांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नगरी. किराना घराण्याला ‘मिरज घराणे’ म्हणावे, इतका घनिष्ठ संबंध ‘किराना’ चा मिरजेशी आला. विष्णू दिगंबर पलूसकर आणि अब्दूलकरीम खाँ यांचे मिरजेवर इतके प्रेम की मृत्यूनंतर ते इथल्याच मातीशी एकरूप झाले.
ख्यातनाम मृदंगवादक गुरूदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापीत गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनईवादक एस. बी. माने, तिफ्पान्ना मुळे अशी एकाहून एक सरस गायक-वादकांची परंपरा मिरजेला लाभली. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तू, स्मृतिस्थळे, कागदपत्रे, पुतळे याठिकाणी आहेत.
महाराष्ट्रातील तंतुवाद्यनिर्मितीचं आद्य केंद्र मिरजेतच आहे. जगभरातून तंतुवाद्य खरेदी करण्यासाठी संगीतप्रेमी इथं येतात. देशभरातील संगीतविषय परिक्षा नियंत्रीत करणारं गांधर्व महाविद्यालयाचं रजिष्ट्रार कार्यालय इथेच आहे. वर्षभर दहाहून अधिक संगीतमहोत्सव येथे होतात. एकेकाळी मराठी नाटय़संगीताला पोषक ठरलेले आणि बालगंधर्वांच्या भूमिका पदार्पणाने गाजलेले बालगंधर्व थिएटरही प्रसिध्द आहे.
इतकी समृध्द संगीत परंपरा लाभलेलं मिरज हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावं. या समृध्द परंपरेची माहिती नव्या पिढीला व्हावी, या हेतूने मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे प्रयत्न करण्यात येत आहेत.
या प्रयत्नांना व्यापक स्वरूप यावं या हेतूने ‘म्युझिकल टुरिझम’ चा अभिनव प्रयोग राबविण्याचा संकल्प करण्यात आला. दिवसभराच्या या पर्यटन यात्रेत मिरजेत होऊन गेलेल्या सर्व ख्यातनाम गायक-वादक, संगीतकारांशी संबधीत वास्तू, स्मृतिस्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. तंतुवाद्यनिर्मीतीची प्रक्रिया प्रत्यक्ष उलगडून दाखवण्यात येणार आहे. दिवसभराच्या संगीत पर्यटनाचा समारोप मिरजेच्या संगीतपरंपरेवर आधारीत माहितीपट दाखवून आणि एखाद्या कलाकाराच्या गायन-वादनाने करण्यात येणार आहे.

म्युझिकल टुरिझममध्ये काय पहाल?
१. तंतुवाद्य केंदांतून तंतुवाद्यानिर्मितीची प्रक्रिया.
२. सतारमेकर गल्लीची सफर
३. जुन्या काळातील गझल गाणा -ऱ्या नायकिणीचे वाडे
४. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय,
५. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गुरू निळकंठबुवांचे घर,
६. कुमार गंधर्वांचे गुरू प्रो. बी. आर. देवधर यांचे घर,
७ गायनाचार्य बाळकृष्णबुवा राहत असलेले घर
८ ग्वाल्हेर घराण्याचे गायक महादेवबुवा यांचे घर,
९. नवरात्र संगीत महोत्सवासाठी प्रसिध्द असणारे अंबाबाई मंदिर,
१०. तबलावादक भानूदासबुवा गुरव यांचे घर,
११. संगीतकार वसंत पवार यांची समाधी
१२. नाटय़संगीताच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार बालगंधर्व नाटय़गृह
१३. मिरजेतील प्रसिध्द बँन्ड व्यावसायिकांची केंद्रे
१४. विनायकबुवांनी स्थापन केलेले पलूसकर स्मृति मंदिर
१५. ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा
१६. अब्दूलकरीम करीम खाँची समाधी
१७. खाँसाहेबांच्या संगीतसेवेचे साक्षीदार असणारं चिंचेचं झाड
१८. ख्यातनाम गायक-वादकांची ऐतिहासिक कागदपत्रे,
१९. मिरजेतील गायकांची जुन्या रेकॉर्ड फ्लेअरवरील गाणी
२० मिरजेतील सनईवादक घराण्यांची माहिती
२१. व्हटकर कुटुंबांची तबला निर्मिती परंपरा
संगीतरत्न अब्दूलकरीम खाँची समाधी
संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ यांची समाधी मिरासाहेब दर्गा आवारात आहे. खाँसाहेबांची मिरासाहेबांवर खूप श्रध्दा होती. मिरासाहेबांच्या कृपेनेच फ्लेगच्या गंभीर आजारातून आपला पुर्नजन्म झाल्याची खाँसाहेबांची भावना होती. त्यामुळे मृत्यूनंतर आपला देह मिरासाहेबांच्या चरणीच दफन करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे दर्गा आवारात दफन करण्यात आले. तेथे सुंदर असे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याशेजारी त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांचीही समाधी आहे. खाँसाहेबांच्या समाधीवर त्यांच्या आवडत्या दरबारी कानडा रागाच्या नोटेशन्स् कोरण्यात आल्या आहेत.
दर्गा आवारातील चिंचेचं झाड
मिरासासाहेब दर्गा आवारातील चिंचेचे एक झाड हे अब्दूलकरीम खाँच्या गायनसेवेचे साक्षीदार आहे. खाँसाहेब प्रत्येक उरूसाच्या दुसऱया दिवशी याच झाडाखाली बसून गायनसेवा करीत. खाँसाहेब देशभरात कुठेही असले तरी मिरासाहेबांचा उरूस कधीही चुकवत नव्हते. खाँसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची गायनपरंपरा त्यांच्या शिष्यांनी जपली आहे. दरवर्षी मिरासाहेब दर्गा उरूसाला जोडून दुसऱया दिवशी किराणा घराण्याचे शिष्य गायन करतात.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं मुख्य रजिष्ट्रार कार्यालय मिरजेत आहे. तेथून देशभरातील संगीत परिक्षांचे नियंत्रण करण्यात येते. बळवंत जोशीसारखे संगीतप्रेमी रजिस्ट्रार या संस्थेला लाभले. त्यांच्या प्रयत्नातून सुमारे साडेतीनशे तास सलग चालेल एवढय़ा वेळचे रागदारी संगीत त्यांनी जतन करून ठेवले. अशा ‘संगीत कलाविहार’ हे संगीत विषयाला वाहून घेतलेले 60 वर्षांहून अधिक काळचे मासिक येथूनच प्रसिध्द होते.
वर्षभर संगीतमहोत्सवांत रंगलेली नगरी
मिरज शहरात गेली 80 वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारचे संगीत महोत्सव होत असतात. वर्षभर विविध गायक-वादकांच्या स्मृतिप्रत्यिर्थ्य होणाऱया या संगीतमहोत्सवांत जगद्विख्यात कलाकार सहभागी होत असतात. दर्ग्यात तीन दिवस होणारा अब्दूलकरीम खाँ महोत्सव, अंबाबाई मंदिरात होणारा नवरात्र संगीत महोत्सव, गणपतराव कवठेकर संगीत सभा, उमरसाहेब मिरजकर संगीत सभा, भानूदासबुवा गुरव संगीत सभा, पन्नालाल घोष संगीत सभा, आबासाहेब सतारमेकर स्मृती संगीत सभा, प्रत्येक महिन्याच्या दुर्गा अष्टमीला उदयोन्मुख कलाकारांसाठी संगीत सभा यांसह अन्य संगीत विषयक कार्यक्रमांनी संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते.
तंतुवाद्याचे माहेरघर
मिरज शहराची ओळख देशात ‘तंतुवाद्याचे माहेरघर’ अशीच आहे. सन 1850 च्या सुमारास फरीदसाहेब शिकलगार यांनी शहरात पहिले तंतुवाद्य तयार केले. आणि त्यानंतर तंतुवाद्यनिर्मितीची मोठी परंपरा शहरात निर्माण झाली. फरीदसाहेब, मोहीदीनसाहेब, पीरसाहेब, हुसेनसाहेब या मंडळीबरोबरच चाँदसाहेब सतारमेकर, विलायत हुसेनसाहेब, उमरसाहेब मिरजकर यांनी तंतुवाद्यनिर्मीतीमध्ये मोलाची भर घातली. सतार, तानपूरा, दिलरूबा, सारंगी, रूद्रवीणा अशी एकाहून एक सरस वाद्ये या कलाकारांनी तयार केली. आज 30 हून अधिक दुकाने तंतुवाद्यनिर्मितीमध्ये व्यस्त आहे. भोपळा घेतल्यापासून ते संपूर्ण तंतुवाद्य तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया पाहण्यासारखी आहे.
संगीतविषयक ऐतिहासिक कागदपत्रे
मिरजेच्या समृध्द संगीत परंपरेची माहिती देणारी दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. यामध्ये तंतूवाद्य निर्माते फरीदसाहेब, हुसेनसाहेब यांची कागदपत्रे, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, संगीतरत्न अब्दूलकरीम खाँ, विष्णू दिगंबर पलूसकर, बालगंधर्व, यांची कागदपत्रे, विनायकबुवा पटवर्धन यांची डायरी, दर्ग्यातील पहिल्या संगीत सभेचे वृत्तांत आणि माहिती पत्रके, तत्कालीन संगीतविषयक निमंत्रण पत्रिका, शापीत गंधर्व वामनबुवा चाफेकर, तत्कालीन गजल गायिका असणाऱया नायकिणींची कागदपत्रे यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे पर्यटन यात्रेत दाखविण्यात येणार आहेत.
तंतूवाद्याच्या प्रतिकृती
तंतूवाद्य निर्मितीबरोबर शहरात तंतूवाद्यांच्या आकर्षक आणि सुबक अशा छोटय़ा प्रतिकृती तयार करण्यात येतात. या प्रतिकृतींना देशभरातून मोठी मागणी आहे. या प्रतिकृतींचे मार्केटींग करण्याची संधी मिरजेच्या संगीत पर्यटनात उपलब्ध होऊ शकते. तंतूवाद्यांचे प्रतिकृत असणारे छोटे किचेन्स, लॅम्प व तंतूवाद्यांतून तयार होणाऱया अन्य आकर्षक छोटय़ा प्रतिकृती तयार करुन संगीत पर्यटनासाठी येणाऱया व्यक्तींना विक्री करता येतील. त्या माध्यमातून तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मिरजेच्या संगीत वैभवात भर घालणारा प्रयोग
मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून संगीत विषयक वास्तूंना भेटी देण्याचा उपक्रम सुरू आहे. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी यासाठी येत असतात. मात्र, ‘संगीत पर्यटन’च्या माध्यमातून देशभरातील पर्यटकांना एक अभिनव पर्यटन करण्याची संधी मिळणार आहे. मिरजेत असलेल्या अनेक दुर्लक्षित संगीत विषयक स्थळांना न्याय मिळून शहराच्या वैभवशाली संगीत परंपरेत भर पडेल, असा विश्वास ज्येष्ठ तंतूवाद्य निर्माते मजिद सतारमेकर यांनी व्यक्त केला.
देशातील पहिले संगीत पर्यटन
मिरज शहराला मोठी संगीत परंपरा लाभल्याने गेल्या काही वर्षांपासून या संगीत परंपरेची ओळख नव्या पिढीला करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी संगीत विषयक छोटय़ा सहलीद्वारे शहरातील संगीत विषयक वास्तू, स्मृतीस्थळे, तंतूवाद्य निर्मितीचा प्रवास अशा गोष्टी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. या संगीत पर्यटनास व्यापक स्वरुप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिरजेतील नागरिक आणि शासन, महापालिका यासाठी आम्हाला सहाय्य करेल, असा विश्वास या संगीत पर्यटनाचे संकल्पक मानसिंगराव कुमठेकर यांनी व्यक्त केला.ऋ

