
लोहोणेर येथील जनता विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून सलामी देताना भैय्यासाहेब देशमुख, मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के, पर्यवेक्षक विलास निकम व उपस्थित मान्यवर.(छाया : सुनिल एखंडे)
संचलन, सामूहिक कवायत व वृक्षारोपणाने कार्यक्रमाची रंगत; विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ
लोहोणेर-:( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘सारे जहाँ से अच्छा’च्या गजराने विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख होते. यावेळी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष नितीन आहेर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश आहिरे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यशवंत शेवाळे, विविध समित्यांचे सदस्य, मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व पर्यवेक्षक विलास निकम यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्यदिनाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. ध्वजपूजनानंतर राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्काऊट-गाईड ध्वजारोहण नितीन आहेर यांच्या हस्ते झाले.यावेळी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. त्यानंतर स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीने कार्यक्रमाची रंगत वाढली.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी सूत्रसंचालन, तर राकेश थोरात यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

