
नांदगाव ( प्रतिनिधी ):: ज्ञानवर्धिनी विद्यालय प्रसारक मंडळ, नाशिक आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य आनंद जोर्वेकर व बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बालकवी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय, नांदगाव येथे होणार आहे.

बालकांमधील काव्यवाचन, लेखनकौशल्य, सादरीकरणाची कला आणि साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत तीन गट करण्यात आले आहेत. प्रथम गटात इयत्ता ३ री ते ५ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘बाल गट’ असून, त्यात अन्यरचित काव्यवाचन होणार आहे. द्वितीय गटात इयत्ता ६ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘किशोर गट’ असून, स्वरचित काव्यवाचन करावे लागणार आहे. तृतीय गटात इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘कुमार गट’ असून, या गटातही स्वरचित काव्यवाचन अपेक्षित आहे.
स्पर्धेच्या नियमांनुसार कविता मराठी भाषेत असावी; कवितेला विषयाचे बंधन नाही. किशोर व कुमार गटातील स्पर्धकांनी केवळ स्वरचित कविता सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपल्या स्वरचित कवितेच्या दोन प्रती स्वहस्ताक्षरात आणाव्यात, त्यापैकी एक प्रत आयोजकांकडे जमा करावी. प्रत्येक स्पर्धकाने दोन कविता सादर करणे अपेक्षित आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येक गटानुसार आकर्षक सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून, स्पर्धेला ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये विश्वविक्रमी नोंद प्राप्त झाल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याने स्पर्धकांनी त्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ५० रुपये असून अधिक माहितीसाठी आयोजकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, साहित्यिक जाणिवेला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळणार असून, नांदगाव परिसरातील विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन व्हि. जे . हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

