
नाशिक:-( रविंद्र मालुंजकर)येथील उगले परिवाराच्या देण्यात येणारा दगूबाई बापूराव उगले स्मरणार्थ पहिला काव्य पुरस्कार चोपडा येथील ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाल्याचे आयोजक कवी राजेंद्र उगले, संजय उगले आणि विजय उगले यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्रभरातून आलेल्या ४४ काव्यसंग्रहांतून अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या संग्रहाची निवड परीक्षक कवी विवेक उगलमुगले आणि गझलकारा जयश्री वाघ यांनी केली आहे. पुरस्कारप्राप्त संग्रहात जीवनानुभवांचे उपयुक्त असे चिंतन आहे. माणसाच्या जगण्याचे टोकदार ताणे-बाणे आहेत. अथांग अशा माणूसपणाच्या कृतज्ञ नोंदी आहेत. रोख रक्कम रु.३ हजार रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपातील पुरस्काराचे वितरण रविवार दि.२७ सप्टेंबर रोजी नाशिकच्या हुतात्मा स्मारकात सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ कीर्तनकार हभप बापूराव महाराज उगले यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, परीक्षक विवेक उगलमुगले, जयश्री वाघ, रवींद्र मालुंजकर, माणूसमित्र सुरेश पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

